Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकजि.प.शिक्षण विभागाचा 'डोनेट अ बुक' उपक्रम

जि.प.शिक्षण विभागाचा ‘डोनेट अ बुक’ उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गावागावात वाचनालय निर्मिती करुन विद्यार्थ्यांमधे वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ‘डोनेट अ बुक’ उपक्रम सुरू केला आहे.

- Advertisement -

या उपक्रमांतर्गत आतापर्यत जिल्हयातील २४३९ शाळांमध्ये वाचनालय सुरू करण्यात आली असून या वाचनालयांसाठी ४१ हजार पुस्तक दान स्वरुपात लोकसहभागातून प्राप्त झाली आहेत. सध्याच्या ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांपेक्षा मोबाइल अधिक असल्याने विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी , असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हयातील दानशुर व्यक्तींना पुस्तक दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जिल्हयात पहिली ते आठवी पर्यतच्या ३२६६ शाळा आहेत. यापैकी २४३९ शाळांमध्ये वाचनालये सुरु करण्यात आली असून या शाळांमध्ये १ लक्ष ९९ हजार ५८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापूर्वी वाचनालयांमध्ये ५ लक्ष ७२ हजार ७३३ पुस्तक उपलब्ध असून त्यामध्ये ‘डोनेट अ बुक ‘उपक्रमांतर्गत जमा झालेल्या ४१ हजार पुस्तकांची भर पडली आहे.

गाव तेथे वाचनालयांतर्गत प्राथमिक शाळामंध्ये २१५२ वाचनालये, ग्रामपंचायत कार्यालयात २९, समाजमंदिरात १५६ तर इतर ठिकाणी ९५ वाचनालये सुरु करण्यात आलेली असून १ लक्ष ६८ हजार ६७५ विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. यासाठी वाचनालयांमध्ये दररोजच्या नोंदी ठेवण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेश म्हसकर यांनी दिली.

सध्याच्या ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांपेक्षा मोबाइल अधिक असल्याने विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. २२ ऑगस्ट रोजी लोकसहभागातून पुस्तके मिळवून शाळेत वाचनालय सुरू करण्याचा प्रथम मान नाशिक जिल्ह्यात सारोळे खुर्द ता.निफाड या शाळेने लोकसहभागातून मिळवला होता. त्यानंतर जिल्हयातील सर्व शाळांमध्ये या उपक्रमास सुरूवात करण्यात आली आहे.

या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर ,मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी शिक्षकांचे व ग्रामस्थांचे कौतुक केले असून या उपक्रमासाठी पुस्तक दान करण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, या उपक्रमांतर्गत देवळा तालुक्यातील फागंदर शाळेतील विद्यार्थी शेतातील बांधावर बसून निर्सगाच्या सानिध्यात पुस्तकांचे वाचन करीत आहेत. देवळा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सतिश बच्छाव यांनी तेथे भेट देऊन विद्यार्थी तसेच शिक्षकांचे कौतूक केले.

वाचनाची आवड होण्यासाठी उपक्रम- बनसोड ग्रंथ आणि वाचनालय एकाच गाडीचे दोन चाक आहेत. परंतु आधूनिकतेच्या युगात मोबाईल व इंटरनेच्या प्रभावाने युवा पिढीत ग्रंथ वाचनाची आवड कमी होत आहे. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी गाव तेथे वाचनालय, शाळा तेथे ग्रंथालय हा उपक्रम राबविणे गरजेचे आहे.

यासाठीच जिल्हा परिषदेने “डोनेट अ बुक” उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ होणार असून यातून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासही मदत होणार आहे. या उपक्रमांसाठी पुस्तकांचे दान करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या