Friday, April 26, 2024
Homeनगरदिवाळीच्या सुट्ट्यामुळे नगर-पुणे महामार्गावर वाहनांचा पूर!

दिवाळीच्या सुट्ट्यामुळे नगर-पुणे महामार्गावर वाहनांचा पूर!

अहमदनगर/पारनेर |प्रतिनिधी|Ahmednagar| Parner

दिवाळी सणातील मुख्य लक्ष्मीपूजन आज होत आहे. तर दिवाळीसाठी शुक्रवारपासून सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. यामुळे पुण्याहून नगर, औरंगाबाद, बीडसह गावाकडे जाणार्‍या वाहनांचे लोंढे सध्या पुणे- नगर रस्त्यावर दिसत आहे. यामुळे महामार्गावरून वाहनांचा पूर असल्याचे दिसत आहे. या वाहनाच्या महापुरातून वाहतूक सुरळीत करण्याचे दिव्य सध्या सुपा पोलीस करताना दिसत आहेत.

- Advertisement -

दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे सध्या सर्वच रस्त्यावर गर्दी असल्याचे दिसत आहे. दीपावली, पाडवा व भाऊबीज साजरी करण्यासाठी मुंबई पुण्याकडील नोकरदार मोठ्या प्रमाणात गावाकडे येत असल्याने गेल्या तीन चार दिवसांपासून पुणे- नगर महामार्गावर वाहनांचा महापूर आला आहे. मोठ्या प्रमाणात वाहने महामार्गावर आल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते आहे. तसेच गर्दीमुळे अपघातांची शक्यता देखील वाढलेली असते. वाहतूक काेंंडी होऊन, गर्दीतून रुग्णवाहिकांची मुक्तता व्हावी यासाठी पोलीस विभागाची वाहतूक शाखा प्रयत्न करत असते.

पुणे-नगर महामार्गावर सध्या सुपा पोलीस, महामार्ग पोलीस लक्ष ठेवून असून सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी सण उत्सवाच्या निमित्ताने वाहनांची होणारी गर्दी गृहीत धरून सुपा टोल नाका, सुपा एमआयडीसी चौक व सुपा बस स्थानक चौक ते सुपा विश्रामगृह याठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. सर्वप्रथम गोकावे यांनी एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांना बोलावून रस्त्यावर उभ्या रहाणार्‍या सर्व बसेस सुपा बस स्थानकात घेण्याच्या सूचना केल्या. यामुळे प्रवासी व एस. टी. बसेस आत आल्याने माहामार्गावर गर्दी कमी झाली. त्यानंतर गोकावे यांनी स्वतः चौकात थांबत टप्प्याटप्याने नगर- पुणे व पारनेर- श्रीगोंदा अशी वाहतूक सुरळीत केली.

या चौकात मोठा बंदोबस्त ठेवला. त्यामुळे चौकात कुठेही आडवे तिडवे वाहन शिरले नाही. पर्यायाने वाहतूक कोंडी झाली नाही. सुपा पोलीस बस स्थानक चौक ते विश्रामगृहापर्यंत वाहन थांबाल्यास कारवाई करत होते. त्यामुळे याठिकाणीही वाहतूक कोंडी झाली नाही. तर चौकात, महामार्गावर विनाकारण फिरणारे, नियम मोडणारे वाहन चालक, विना नंबरची वाहने, परवाने नसलेले वाहन चालक, वाहन चालवताना फोनवर बोलणारे चालक यांच्यावर कारवाई केली. यामुळे दुचाकी वाहनचालकांसह इतर टाईम पास करणार्‍यांवर कारवाई झाल्याने या महाभागांनी तेथून पळ काढला.

तर बस स्थानकात लावलेल्या वाहनांवरही कारवाई केल्याने अनेकांनी चौकातून काढता पाय घेतला. यामुळे चौकातील गर्दी कमी झाली व वाहतूक सुरळीत झाली. सुपा पोलिसांनी सणवाराची गर्दी गृहीत धरून वाहतुकीचे नियोजन केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी कमी झाली. कोठेही वाहन चालकांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसला नाही. गर्दीच्या काळात याच मार्गावर वाहन एकमेकांना घासणे, कट मारणे वाहने, दुकाची आडवीतिडवी लावणे यामुळे नेहमीच भांडणे होत असत. मात्र, गोकावे यांच्यासह पीएसआय तुळशीराम पवार, अमोल धामणे, यशवंत ठोंबरे, आकबर पठाण यांच्यासह अन्य पोलीस कर्मचार्‍यांनी दोन दिवसांपासून चौकात ठाण मांडून वाहतूक सुरळीत केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या