Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्याची मतदार यादी प्रसिद्ध

नाशिक जिल्ह्याची मतदार यादी प्रसिद्ध

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून तब्बल 56 हजार नऊ मतदारांची नावे विविध कारणांनी मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. तर 41 हजार 589 नवीन मतदारांची भर पडली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमाअंतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अद्ययावत आणि अचूक राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणजे नवीन मतदारांची नोंदणी, मयत व दुबार मतदारांची नावे यादीतून वगळणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. याशिवाय एकाच मतदाराची वेगवेगळ्या मतदार संघात नावे असल्याचे प्रकारदेखील पुढे आले आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शाखेद्वारे जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांत विशेष संक्षिप्त कार्यक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये मृत्यू झालेल्या, स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे वगळण्यासह दुबार नावे वगळण्याचे काम प्रभावीपणे करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल 56 हजार नऊ जणांची नावे वगळण्यात आली आहेत.

1 जानेवारी 2021 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणार्‍या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. अशी 41 हजार 589 जणांची नावे नव्याने समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे यादीत 14 हजार 420 मतदार कमी झाल्याने एकूण मतदार संख्या 45 लाख 78 हजार 549 वरून 45 लाख 64 हजार 129 झाली आहे. मतदार यादीमध्ये एकाच मतदाराची दोनहून अधिक नावे असण्याचे प्रकारदेखील उघडकीस आले आहेत.

मतदार यादीतील त्रुटी दूर करून यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष संक्षिप्त कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेला. अनेक मतदारसंघांत दुबार व मयतांची नावे वगळण्यात आली आहेत.

प्रशांत पाटील, तहसीलदार निवडणूक शाखा

- Advertisment -

ताज्या बातम्या