Friday, April 26, 2024
Homeजळगावधरणगावजवळ निशाणे फाट्यावर भीषण अपघात : तीन ठार

धरणगावजवळ निशाणे फाट्यावर भीषण अपघात : तीन ठार

धरणगाव – Dharangaon – प्रतिनिधी :

चोपडा रोडवर येथून जवळच असलेल्या निशाणे फाट्याजवळ दोन मोटरसायकलींना समोरुन येणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने यात तीन तरुण ठार झाल्याची विचित्र घटना घडली.

- Advertisement -

विरुध्द दिशेने जाणार्‍या दोन मोटर सायकलींना मोठ्या वाहनाने धडक दिल्याने हा अपघात घडला. रस्त्यावर दयनीय अवस्थेत पडलेले जखमी माणसं आणि रक्ताचे थारोळे बघून हळहळ व्यक्त होत होती.

या बाबत सविस्तर वृत्त असे की बुधवारी सकाळी 7.30 वाजता दोन मोटर सायकलींना एका अज्ञात वाहनाने धडक दिली.

यात तिघांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. हे सर्व कापूस जिनिंगमध्ये काम करणारे मजूर होते. सुना मोहनलाल भिलाला (23, रा. मध्य प्रदेश) हा जागीच ठार झाला तर नारायण लालसिंग बारेला (20) व दिलीप बारेला (25 दोन्ही रा. साळवा) यांना दवाखान्यात नेत असताना त्यांचेवर काळाने झडप घातली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका मोटारसायकलीवर तीन जण हे साळवा येथून बांभोरीकडे तर अन्य एका मोटारसायकलवरुन तीन जण कासोदा येथून मध्यप्रदेशकडे जात होते.

त्याचवेळी निशाणे फाट्याजवळ समोरुन येणार्‍या वाहनाने या दोन मोटारसायकलींना जोरदार धडक दिली. ही धडक इतक्या जोरात होती की, दोन मोटारसायकलीवरील सहाहीजण रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

यात सुना भिलाला हा जागीच ठार झाला तर इतर पाचजण जबर जखमी झाले होते. या जखमींना शिवसेना कार्यकर्ते मोतीलाल पाटील यांनी आपल्या वाहनातून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले.

तिथे डॉ. गिरीष चौधरी यांनी प्राथमिक उपचार केले. या दुर्दैवी घटनेचे वृत्त कळताच गावात एकच हाहाकार उडाला. त्यावेळी रुग्णालयात प्रचंड गर्दी उसडली होती.

नारायण बारेला, दिलीप बारेला, पिंकी मूहलाल भिलाला (22,), संगीता सिताराम भिलाला ( 14 दोघे रा. मध्य प्रदेश), भरत बारेला (25 रा.साळवा), या पाच जणांवर उपचार करुन तात्काळ जळगावला पाठविण्यात आले. वाटेतच नारायण व दिलीप बारेला यांचा मृत्यू झाला. हे सर्व कापूस जिनिंग मध्ये काम करणारे मजूर होते.

नागरीकांचा रास्ता रोको

अपघात झाला त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. यामुळेच अनेक अपघात या ठिकाणी झाले आहेत.

या बाबत ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता यांचेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र याची दखल घेतली जात नाही म्हणून माजी जि. प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही काळ उड्डाणपूलाजवळ रास्ता रोखो केला होता. पोलिस निरीक्षक आणि तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.

- Advertisment -

ताज्या बातम्या