Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedजळगाव : तलाठ्यावर प्राणघातक हल्लाप्रकरणी धरणगाव येथील दोघांची निर्दोष मुक्तता

जळगाव : तलाठ्यावर प्राणघातक हल्लाप्रकरणी धरणगाव येथील दोघांची निर्दोष मुक्तता

जळगाव | प्रतिनिधी

तलाठ्यावर प्राणघातक हल्लाप्रकरणी धरणगाव येथील दोघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
धरणगाव तालुक्यातील फिर्यादी दीपक नवनाथ ठोंबरे, अल्ताफ निजाम पठाण व बालाजी बापुराव लोंढे या तिघं तलाठ्यांची तत्कालीन  तहसीलदारांनी अवैध वाळू उत्खनन, उपसा व वाहतूक रोखण्यासाठी नेमणूक केली होती. त्यासाठी हे तिघंही तलाठी १ जुलै २०१५ रोजी रात्री १२ वाजता ड्युटी करण्यासाठी मोटारसायकल घेवून धरणगाव तालुक्यातील वाकटुकी या गावी बस स्थानकावर थांबलेले होते. या वेळी त्यांना गिरणा नदीकडून वाळूने भरलेला डंपर (क्र.एम एच-२३-५०९०) येताना दिसला. हे डंपर थांबवून डंपरच्या चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना व रॉयल्टीचे टोकन मागितले असता, चालक प्रवीण भास्कर चौधरी याने नाही म्हणून सांगितले. त्यामुळे तलाठी दीपक ठोंबरे हे डंपरवर बसले व त्यांनी चालक प्रवीण चौधरी याला हे डंपर धरणगाव तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले. तसेच त्यांच्या दोन्ही सहकारी तलाठ्यांना डंपरचे मागे येण्यास सांगितले. डंपर सोनवद गावाच्या पुढे आल्यानंतर चालक प्रवीण भास्कर चौधरी व क्लिनर अजय उर्फ छोटू मुरलीधर गुरव या दोघांनी डंपर थांबवित तलाठी दीपक ठोंबरे याला खाली उतरण्यास सांगितले. तसेच उतरला नाहीस, तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. 

- Advertisement -

तेव्हा तलाठी दीपक ठोंबरे यांनी उतरण्यास नकार देऊन हे डंपर धरणगाव तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले. परंतु, दोन्ही आरोपींनी त्याला शिविगाळ करुन चापटाबुक्यांनी मारहाण केली. तर क्लिनर छोटू गुरव याने तलाठी दीपक ठोंबरे याला डंपरमधील लोखंडी रॉडने डोक्यावर मारुन दुखापत करीत डंपरवरुन खाली ढकलून दिले आणि दोघंही जण डंपर घेऊन धरणगावच्या दिशेने पसार झाले. त्यानंतर तलाठी दीपक ठोंबरे याचे इतर दोन्ही सहकारी तलाठी तेथे आले व त्यांनी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या तलाठी दीपक ठोंबरे यांना उचलले व धरणगाव येथे आणले, अशा आशयाची फिर्याद तलाठी दीपक ठोंबरे यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरुन दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३९४, ५०४, ५०६, ३४ व माइन अँड मिनरल रेग्युलेशन ऍक्ट कलम २१(अ) व २१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक झाली होती.

सात साक्षीदार तपासले
या खटल्याचे चौकशीकामी जळगाव सेशन्स कोर्टात सरकारपक्षातर्फे फिर्यादी तलाठी दीपक ठोंबरे, तलाठी अल्ताफ पठाण, नायब तहसीलदार अनिल चव्हाण, सरकारी पंच, तपासाधिकारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत बनकर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश खेताडे यांच्यासह एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.साक्षीदारांच्या जबानीतील तफावती, अविश्वासार्हता तसेच तपासकामातील त्रुटी आदी बाबींचा विचार होऊन  जिल्हा व सत्र न्या.गोविंद सानप यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. दोन्ही आरोपींतर्फे बचावाचे काम ऍड. वसंत आर ढाके यांनी पाहिले. त्यांना ऍड. प्रसाद व्ही. ढाके, ऍड. भारती व्ही. ढाके व ऍड. श्याम बी.जाधव यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या