Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारअन् तळोदा प्रकल्प अधिकार्‍यांनाही खेळाचा मोह आवरेना!

अन् तळोदा प्रकल्प अधिकार्‍यांनाही खेळाचा मोह आवरेना!

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत धडगाव, अक्कलकुवा, तळोदा तीन तालुक्यांची प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकतीच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शिर्वे येथे पार पडली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी थिा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनाही खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मैदानावर बसून या खेळाचा आनंद लुटत खेळाडूंचा उत्साह वाढवला.

- Advertisement -

शिर्वे येथे नुकत्याच प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये अक्कलकुवा, धडगाव, तळोदा प्रकल्प अंतर्गत शासकीय व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

यावेळी १४ वर्षे खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, हँडबॉल, ऍथलेटिक्स, १७ वर्ष खो खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, हँडबॉल, ॲथलेटिक्स, १९ वर्ष खोखो, व्हॉलीबॉल, कबड्डी अशा विविध सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये एकूण ९८० विद्यार्थी सहभागी झाले. १९ वर्ष मुलींची खो-खो खेळाची फायनल मॅच पाहण्यासाठी गावकरी तसेच सर्व खेळाडू यांनी गर्दी केली.

यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनाही खेळाचा आनंद घेण्याचा मोह आवरता आला नाही. मीही एक खेळाडू आणि प्रेक्षक आहे ही भावना विद्यार्थी व शिक्षकांमध्ये रुजवण्यासाठी स्वतः विद्यार्थ्यांसोबत मैदानावर बसून त्यांनी या खेळाचा आनंद लुटत खेळाडूंचा उत्साह वाढवला.

माणूस पदाने नाही तर आपल्या वागणुकीने मोठा असतो हे त्यांनी आपल्या वर्तणुकीतून दाखवत सर्व प्रेक्षकांनी सामना मैदानावर बसून खेळाडूंचा उत्साह वाढवला. यावेळी तळोदा विरुद्ध अक्कलकुवा मुलींचा सामना अतिशय रंगतदार झाला.

दोन्ही संघांनी जिंकण्यासाठी प्रयत्न केले. परंतु अक्कलकुवा संघाने बाजी मारत एक गुणाने निसटता विजय मिळवत अंतिम फेरी जिंकली. यावेळी मंदार पत्की यांनी विजयी संघ खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे उपविजेत्या संघाचे मनोबल वाढविण्यासाठी पुन्हा सराव करा आणि पुन्हा खेळाची मजा घ्या असे आवाहन केले.

या क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, कृष्णा कोकणी, विस्तार अधिकारी गुलाबसिंग अखडमल, बबन मुगळे, शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत नेमण्यात आलेल्या विविध समित्यांमध्ये सहभागी असलेले मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

२०१९ च्या बॅचचे आयएसएस अधिकारी

तळोदा येथील एकात्मीक आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारीपदी मंदार पत्की यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०१९ च्या बॅचचे आयएसएस अधिकारी आहेत.

बीड जिल्हयातील रहिवासी असलेले पत्की यांनी शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज पुणे येथून पॉलिटेक्निक डिप्लोमा केला आहे. विश्वकर्मा विद्यापीठातून बीटेक पदवी घेतली आहे.

श्री.पत्की यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशातून २२ व्या क्रमांकावर उत्तीर्ण होवून अतिशय कमी वयात आयएएस होण्याचा बहुमान मिळविला आहे. असे तरुण तडफदार प्रकल्प अधिकारी तळोदा प्रकल्पाला लाभले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून तळोदा प्रकल्पातील कारभारात सकारात्मक बदल घडवण्याची अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या