महिलेचे मंगळसूत्र भामट्यांनी धूमस्टाईलने ओरबाडले

jalgaon-digital
2 Min Read

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara

मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात तीन भामट्यांनी ज्योती कराळे या महिलेच्या गळ्यातील 20 हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र ओरबडून मोटरसायकलवर धूम ठोकली. ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील शेटेवाडी जवळील कराळे मळा येथे दि. 7 ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेने शेटेवाडी परिसरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान नगर – मनमाड महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली असल्याने सध्या राहुरी कॉलेज ते देवळाली प्रवरा हा जूना राहुरी – देवळाली रस्ता डांंबरीकरण झाल्याने सुस्थितीत असल्याने व महामार्गाला समांतर रस्ता असल्याने गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याने वर्दळ वाढली आहे. त्यातूनच अशा घटना घडू लागल्या आहेत.

ज्योती नवनाथ कराळे (वय 33) रा.शेटेवाडी जवळ, कराळे मळा, देवळाली प्रवरा, ता. राहुरी. या दि. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कराळे वस्ती येथील शेतामधून चारा घेऊन देवळाली प्रवरा ते शेटेवाडी रोडने पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आलेल्या तीन अज्ञात भामट्यांनी ज्योती कराळे यांच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाचे 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने ओरबाडून मोटरसायकलवरुन राहुरीच्या दिशेने पळून गेले.

घटनेनंतर ज्योती कराळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 969/2022 भादंवि 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा हे करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *