Thursday, April 25, 2024
Homeनगरजलसंधारण विभागाच्या 862 प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी 168 कोटींचा निधी मंजूर

जलसंधारण विभागाच्या 862 प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी 168 कोटींचा निधी मंजूर

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

राज्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील 862 प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी 168 कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असल्याने

- Advertisement -

प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढून पूर्ण संकल्पित क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

श्री.गडाख म्हणाले,कामाची गुणवत्ता उत्तर दर्जाची राहील याची जबाबदारी जलसंधारण अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्येक कामांची उलटतपासणी करण्यात येणार आहे. दुरुस्ती कामाचा दोष दायित्व कालावधी 5 वर्षांचा राहणार आहे. प्रत्येक कामांचे जिओटॅग व व्हिडीओ चित्रिकरण बंधनकारक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. गडाख यांनी माहिती देताना सांगितले की, राज्यातील विविध विभागातील 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेल्या 802 प्रकल्प आणि 100 ते 250 हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेले 60 प्रकल्पांच्या दुरुस्ती अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. त्यामुळे प्रकल्पातील पाणी वाया जात होते. शेतकर्‍यांना प्रकल्प आपल्या परिसरात असूनही त्याचा लाभ होत नव्हता. शेतकर्‍यांना त्या प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग योग्य प्रकारे होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात येणार आहे.

या दुरुस्तीमध्ये 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेल्या कामात अमरावती विभागातील 202 कामांना 57.23 कोटी, औरंगाबाद 227 कामांना 34.40 कोटी,ठाणे 2 कामांना 18 लाख, नागपूर 93 कामांना 14.78 कोटी,नाशिक 120 कामांना 31.62 कोटी, पुणे 157 कामांना 64 लाख मंजुरी देण्यात आली आहे.

तर 100 ते 250 हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेल्या ठाणे विभागातील 2 कामांना 6.22 कोटी, नाशिक 7 कामांना 4.59 कोटी, पुणे 25 कामांना 11.22 कोटी,अमरावती 18 कामांना 3.97 कोटी,औरंगाबाद 4 कामांना 1.11 कोटी आणि नागपूर 4 कामांना 1.70 कोटी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार…

दुरुस्ती करण्यात येणार्‍या योजनांची कार्यकारी अभियंता धरण सुरक्षितता संघटना यांनी पाहणी केलेली असून पाहणीनुसार दिलेल्या निरीक्षण टिपण्णीनुसार प्रादेशिक जलसंधारण अधिकारी तथा अधीक्षक अभियंता, यांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार प्रकल्पांच्या खालील बाजूस उतारावर पाण्याची गळती असल्याने तसेच विमोचकाचे बांधकाम दगडी असून त्यामुळे प्रकल्पांना धोका संभवू शकतो असे निरीक्षण नोंदविलेले आहे. सदर दुरुस्तीची कामे केल्यानंतर प्रकल्पांची साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत पूर्ण क्षमतेने क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या