Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदेवळाली-भुसावळ पॅसेंजर नव्या रूपात

देवळाली-भुसावळ पॅसेंजर नव्या रूपात

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिककरांबरोबरच खान्देशवासियांसाठीही लाडाची असलेली भुसावळ-देवळाली पॅसेंजर (Bhusawal-Deolali Passenger)ही गाडी 16 सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने ( Central Railway ) घेतला आहे. रेल्वेने याबाबत पत्रक काढले आहे. विभागीय मुख्य वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

सिडको, सातपूर, गोंदे, सिन्नर, दिंडोरी औद्योगिक भागात तसेच नाशिकरोड, पंचवटीमध्ये खान्देशवासीय मोठ्या प्रमाणावर राहतात. करोना संकटामुळे ही गाडी अडीच वर्षांपासून बंद असल्याने खान्देशात ये-जा करणार्‍या या रहिवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही गाडी आता नवीन नंबरसह सुरू होत आहे. तिच्या वेळेतही बदल करण्यात आलेला आहे.

मात्र, ही गाडी पॅसेंजरऐवजी मेल एक्स्प्रेस असून भाडेही जास्त असेल. गाडीला बारा डबे असून त्यातील दहा जनरलचे आणि दोन ब्रेक व्हॅन आहेत. गाडी क्रमांक 11114 अप भुसावळ-देवळाली ही भुसावळहून येत्या 16 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता नियमित सुटेल. तर गाडी क्रमांक 11113 डाऊन देवळाली-भुसावळ पॅसेंजर ही देवळालीहून 17 सप्टेंबरला सकाळी 7:20 वाजता नियमित सुटेल.

संघटनांकडून स्वागत

देवळाली-भुसावळ गाडी सुरू होत असल्याबद्दल मासिक पासधारक प्रवासी वेल्फेअर असोसिशनचे अध्यक्ष राजेश फोकणे, उपाध्यक्ष किरण बोरसे, कैलास बर्वे, संजय शिंदे, क्रांती गायकवाड, दीपक कोरगावकर, रतन गाढवे, सुदाम शिंदे, संतोष गावंदर, उज्ज्वला कोल्हे यांनी तसेच पंचवटी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब केदारे, कार्याध्यक्ष अरुण गिरजे, शिवनाथ कासार, उपाध्यक्ष पोपट नागरे, सचिव दीपक भदाणे, सहसचिव गोपीनाथ कासार, खजिनदार मनोहर पगारे यांनी स्वागत केले आहे.

सोय आणि गैरसोय

या गाडीची देवळालीहून सुटण्याची वेळ पहाटे 5 ऐवजी 7.20 अशी आहे. त्यामुळे नाशिक ते नांदगावदरम्यानच्या नोकरदार, व्यावसायिक आदींची सोय झाली आहे. करोनापूर्वी ही पॅसेंजर पहाटे 5 वाजता देवळालीहून सुटत होती. त्यामुळे नाशिकमधील खान्देशवासियांना भुसावळला दुपारी 12 च्या आत पोहोचता येत असे.

कुटुंबियांसह खान्देशवासीय या गाडीने प्रवास करतात. पॅसेंजरचे भाडे कमी असते त्यामुळे या गाडीला कायम गर्दी असायची. जादा भाडे व नवीन वेळेमुळे खान्देशवासियांची गैरसोय होणार आहे. या गाडीशिवाय खान्देशवासियांसाठी दुसरी गाडी इगतपुरी-भुसावळ ही होती. ती पूर्वी मुंबई-भुसावळ पॅसेंजर म्हणून धावत असे. काही महिन्यांपूर्वी ती इगतपुरी भुसावळ मेमू गाडी म्हणून सुरू करण्यात आली आहे. आता देवळाली-भुसावळ ही पॅसेंजरऐवजी मेल एक्स्प्रेस म्हणून सुरू होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या