Friday, April 26, 2024
Homeनाशिकमहाजे येथे महिला सरपंच उमेदवारावर हल्ला

महाजे येथे महिला सरपंच उमेदवारावर हल्ला

दिंडोरी । dindori

दिंडोरी तालुक्यातील महाजे येथे सरपंच – उपसरपंच पदाच्या महिला उमेदवारांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी वेळीच धाव घेत महिला सरपंचाचा जीव वाचवत पुढील अनर्थ टळला, मात्र विरोधी गटाच्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पाच पोलीस व काही ग्रामस्थ जखमी झाले आहे. दरम्यान कडक पोलीस बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया पार पडत सरपंचपदी रुपाली सोमनाथ भोये तर उपसरपंचपदी कविता ज्ञानेश्वर इंगळे यांची निवड झाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील महाजे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणुकीसाठी तहसीलदार पंकज पवार यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी भोये यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाजे येथील ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सादराळे व शृंगारपाडा येथील सदस्यांचे बहुमत असल्याने येथील सरपंच उपसरपंच निवड होण्याची शक्यता होती.

त्यास महाजे येथील सदस्य व काही ग्रामस्थांचा विरोध होता येथे वाद होण्याची कुणकुण पोलीस प्रशासनाला लागल्याने येथे वाढीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सादराळे व शृंगारपाडा येथील सदस्य निवडणूक प्रक्रियेस आले असता त्यांना अडवत प्रक्रियेसाठी जाण्यापासून रोखण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात जमा होत्या. त्यांनी सदस्यांना अडविण्याचा प्रयत्न केला.

काही ग्रामस्थांनी दगडफेक केली मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात जाऊ दिले मात्र या गोंधळात काही महिलांनी सरपंच पदाच्या उमेदवार रुपाली सोमनाथ भोये यांना रोखत त्यांचेवर हल्ला केला. साडीने गळा अवळण्याचा प्रकार झाला. एक वृद्ध महिलेलाही मारहाण झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, हवालदार पजई, युवराज खांडवी आदी पोलिसांनी धाव घेत महिलेची सुखरूप सुटका केली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कलपेशकुमार चव्हाण, युवराज खांडवी, पजई यांच्यासह पाच पोलीस जखमी झाले. पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलवत निवडणूक प्रक्रिया विहित वेळेत पार पडली.पोलिसांनी काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या