हजरत गौसे आझम व इमाम अबु हनिफा यांच्या पवित्र ‘गलेफ’चे मिळणार दर्शन

jalgaon-digital
2 Min Read

जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik

पिराने पीर रौशन जमीर बडे पीर हजरत गौस-ए-आझम यांच्या पवित्र जयंतीनिमित्त येथील खडकाळी मशिदीत दोन दिवस बगदाद शरीफ येथील पवित्र मजार शरीफवरुन आलेल्या तसेच ज्येष्ठ धर्मगुरू हजरत इमामे आझम अबु हनिफा यांच्याही मजार शरीफवरुन आलेल्या पवित्र ‘गलेफ’ (चादर) चे भाविकांना दर्शन मिळणार आहे, अशी माहिती अस्लम खान (Aslam Khan) यांनी दिली…

मागील अनेक वर्षांपासून हा सिलसिला सुरू असून यंदाही खडकाळी मशिदच्या आवारात हजरत गौस-ए-आझम व इमामे आझम हजरत अबू हनिफा यांच्या पवित्र मजार शरीफवरुन आलेल्या गलेफचे भाविकांना दर्शन देण्याचा कार्यक्रम मंगळवारी (दि.16) सायंकाळी 5 वाजेपासून सुरू होणार आहे. तर बुधवारी (दि.17) रात्री बारा वाजेपर्यंत चालणार आहे.

या दरम्यान फक्त पुरुषांना याठिकाणी प्रवेश राहणार असून दर्शन घेऊन प्रार्थना करण्यासाठी व बसण्याची विशेष सोय करण्यात येणार आहे. ज्येष्ठ धर्मगुरू हजरत अब्दुल मजीद सालीमुल कादरी यांनी नाशिककरांसाठी खास बगदाद शरीफहून नाशिकचे मरहूम हनिफ पाटकरी यांच्याकडे गलेफ पाठवले होते. पाटकरी परिवार व परिसरातील तरुणांच्या वतीने दर्शनाचा कार्यक्रम मागील काही वर्षांपासून अखंडित सुरू असल्याने भाविकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

दरम्यान ज्येष्ठ धर्मगुरू हजरत गौस-ए-आझम यांची जयंतीप्रीत्यर्थ बुधवारी चौक मंडई (Chowk Mandai) येथून जुलुसे गौसीयाची मिरवणूक निवडक लोकांमध्ये काढण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त शहरपरिसरातील मुस्लीम बहुल भागात सजावटीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मशिदी (Masjid), दर्गा शरीफसह मुस्लीम बांधवांची घरे व दुकानांवर विद्युत रोषणाई केली आहे.

इराक येथील पवित्र बगदाद शरीफ येथे गौसे आझम यांची पवित्र मजार शरीफ आहे. दरवर्षी इस्लामी रब्बीउल सानी महिन्याच्या 11 तारखेला जयंती जगभर साजरी होते. नाशिकमध्ये जयंतीनिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी (दि.17) चौक मंडई येथील जहांगीर चौकातून जुलूस काढण्यात येणार आहे. बागवानपुरा, भोई गल्ली, कथडा, शिवाजी चौक, नाईकवाडीपुरा, आझाद चौक, पठाणपुरा, चव्हाटा, बुधवारपेठ, आदम शाह चौक, काझीपुरा, मुल्तानपुरा, बुरूड गल्ली, कोकणीपुरा, दख्नीपुरा, महात्मा फुले मंडई, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौक, हुसैनी चौक, पिंजारघाट आदी प्रमुख मार्गांवरून फिरणार आहे. तर बडी दर्गा शरीफच्या मैदानावर समारोपची प्रक्रिया होणार आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर निवडक लोकांना जुलुसमध्ये भाग घेता येणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *