उन्हाळ्यात दारणा पात्र धोकादायक

jalgaon-digital
3 Min Read

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

भर उन्हाळ्यात ( Summer Season ) दारणा नदीपात्र ( Darna River )भरभरून वाहत असताना पाण्याला बघून कोणालाही मोह होतो तो त्यात डुबकी मारण्याचा. गेल्या 22 वर्षापासून प्रतिवर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वत्र पाण्याची वणवण जाणवत असताना देवळाली कॅम्प परिसरात दारणा नदीत बुडून मृत्युमुखी पावलेल्यांची (Death due to Drowning in the river )संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे ‘आला उन्हाळा, नागरिकांनो आपली मुले सांभाळा’ अशी जनजागृती ( Awarness ) करण्याची वेळ आली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंपिंगलगत असलेल्या लष्करी बंधार्‍यामुळे पाण्याची पातळी खोल असते. त्यामुळे पोहण्यासाठी पाण्यात उतरलेले युवक अंदाज न आल्याने मृत्युमुखी पडतात. गत वर्षी याच ठिकाणी भगूर येथील अनुराग बाळू कापसे या युवकाचे पाण्यात बुडून निधन झाले. अशा घटना प्रतीवर्षी घडत असतात.

याशिवाय संसरी, शेवगे दारणा, बेलतगव्हाण, चेहेडी, पळसे या गांवच्या पाणवठ्याजवळ दरवर्षी असे अपघात घडतात. मुंबई व गुजरातचे अनेक पर्यटक थंड हवेचे ठिकाण म्हणून या परिसरात सुटीचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. याशिवाय लष्करी सेवेत असलेल्या अधिकारी व जवानांची मुलेही सुटीच्या दिवसांत परिसराबाहेरील खेडेगावच्या नदीपात्राजवळ पोहण्यासाठी येत असतात. नदीपात्रात ठिकठिकाणी वाळू उपसा होत असल्याने नदीपात्राचे स्वरूप प्रतिवर्षी बदलत असते. याचा अंदाज पर्यटकांनाच काय परंतु स्थानिक नागरिकांनाही येत नाही.

उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असताना समोर दिसणारे खळाळते पाणी बघून पाण्यात उतरून पोहण्याचा आनंद लुटण्याचा मोह युवकांना होतो. अनेक गांवच्या पाणवठ्याजवळ शासनाने सूचनाफलक लावून सदरची जागा पोहोण्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा दिलेला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून उन्हाळ्यात युवकांचे मोठे टोळके नदीवर हजेरी लावतात. दुर्दैवाने घडू नये त्या घटना घडतात. पोहता न आल्याने व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

याबाबत स्थानिक नागरिक येणार्‍या पर्यटकांना सूचना देत असतात. परंतु त्याकडे लक्ष देतील ते पर्यटक कसले! ‘आम्ही खोलवर जाणार नाही, कडेलाच पोहण्याचा आनंद घेऊ’, असे सांगत असतानाच पाण्याचा भोवरा कधी या युवकांना पोटात घेतो हे बुडणार्‍यालाही कळत नाही. मग सुरू होते ती एकच आरडाओरडी व रडारडी. यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

सुटीचा आनंद घेताना रंगाचा बेरंग होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मुलांसोबत पालकांनीही नदीपात्रावर येणे गरजेचे आहे. जेणेकरून मुले जबाबदारीने पाण्यात उतरतील व अप्रिय घटना टळतील. ज्यांना पोहता येत नसेल त्यांनी पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये. मित्राने उडी मारली म्हणून आपणही पाण्यात मारलेली उडी ही आयुष्यातील शेवटची उडी ठरू शकते. तेव्हा पोहण्याचा आनंद लुटावा मात्र जरा जपूनच!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *