Cyber Crime : पुण्यातल्या बँकेवर सायबर हल्ला; कार्ड क्लोन करून १ कोटी हडपले

पुणे । प्रतिनिधि

बँक खातेदारांची बनावट डेबिट कार्ड (क्लाेन) करुन सायबर चोरट्यांनी भारती सहकारी बँकेची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सायबर चोरट्यांनी मुंबई, पुणे, दिल्लीसह, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील एटीएम केंद्रातून बनावट डेबिट कार्डचा वापर करुन खातेदारांचे पैसे चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी भारती सहकारी बँक लिमिटेडचे कार्यकारी संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील (वय ६२) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती सहकारी बँकेची मुख्य शाखा ही सदाशिव पेठेत आहे. ही बँक पुण्यातील मोठी सहकारी आहे. सायबर चोरट्यांनी डिसेंबर २०२० ते २०२१ या कालावधीत बनावट डेबिट कार्ड (क्लोन) तयार करुन पुण्यातील सदाशिव पेठ, धनकवडी, धानोरी, आकुर्डी, कोथरुड, बाणेर, हडपसर, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, मुंबईतील वरळी, तसेच दिल्लीतील एटीएम केंद्रातून भारती सहकारी बँकेच्या खात्यातून तब्बल १ कोटी आठ लाख १५ हजार ७०० रुपये लंपास केले. ही बाब बँकेच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांनात धाव घेतली. चोरट्यांनी तब्बल ४३९ बनावट डेबिट कार्ड तयार करत ही मोठी चोरी केली आहे. या द्वारे त्यांनी १ हजार २४७ व्यवहार करत १ कोटी ८ लाख रुपयांची रक्कम लंपास केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील पुण्यातील काॅसमाॅस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला करुन तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली होती. ही रक्कम चीनच्या बँकेत वळवण्यात आली होती.