Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकनाशकात स्मार्टसिटीचा अनागोंदी कारभार; आयुक्तांपुढे मांडणार गाऱ्हाणे

नाशकात स्मार्टसिटीचा अनागोंदी कारभार; आयुक्तांपुढे मांडणार गाऱ्हाणे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्मार्ट सिटी कंपनीचे (Smart City Company) अनागोंदी कारभार सुरूच आहे. शहरात विविध ठिकाणी खोदकाम करून ठेवले असून अनेक ठिकाणी काम बंद करून ठेवले आहे. मनपा आयुक्तांच्या भेटीनंतरही गावठाणातील रस्ते विकासातील अनियमितता कायम असून प्रोजेक्ट गोदांतर्गत गोदाघाटावर (Godavari River) बसविलेल्या फरशा पूरात वाहून गेल्या आहेत.

- Advertisement -

स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा सुरू असल्याने महापालिकेनेच आता स्मार्ट कंपनीच्या कारभाराविरोधात केंद्राकडे तक्रार करावी, अशी मागणी कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे (Congress leader Shahu Khaire) यांनी आज महासभेत (Mahasabha) केली.

यामुळे स्मार्ट कामाच्या गोंधळाचा फैसला करण्यासाठी उद्या मंगळवारी (दि.२१) सकाळी 11 वाजता आयुक्त कैलास जाधव (NMC Commissioner Kailas Jadhav) यांच्या दालनात लोकप्रतिनिधी आणि स्मार्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा निर्णय महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांनी जाहीर केला. स्मार्ट प्रकल्पांतील अनागोंदीची चर्चा सोमवारच्या महासभेतही कायम राहिली.

महासभेच्या सुरूवातीलाच खैरे यांनी स्मार्ट सिटी (Smart City) अभियानातील गावठाण विकास योजनेअंतर्गत धुमाळ पाईंट (Dhumal Point) ते नेहरू चौक (Neharu Chauk) दरम्यान साकारण्यात येत असलेल्या स्मार्ट रस्त्याच्या कामातील अनियमिततेकडे लक्ष वेधले. चुकीच्या पध्दतीने या रस्त्याचे काम (Road Work) सुरू असल्याने हा रस्ता पाच फूट खोलवर गेला असून गरूढ रथाचा मार्ग अडचणीत आला आहे. स्थानिक व्यापारी, रहिवाशी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी करून रस्त्याच्या आराखड्यात बदल करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी आपली मनमानी कायम ठेवली असून विरोध केला म्हणून व्यापारी, लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्यासाठी या रस्त्याचे कामच बंद पाडले आहे. गोदावरीला येणाऱ्या पुरात गोदापार्कची वाताहत झाली, हा इतिहासात ताजा असतानाच गोदाघाटावर फरशा बसविण्याचे काम स्मार्ट कंपनीने सुरू केले आहे. नुकत्याच आलेल्या पूरात या फरशाही वाहून गेल्या.

स्मार्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून अशाप्रकारे कोट्यवधींचा चुराडा केला जात असल्यामुळे आता महापालिकेनेच केंद्र शासनाकडे याविरोधात तक्रार करायला हवी, अशी मागणीही खैरे यांनी केली. यावेळी महापौर कुलकर्णी यांनीही स्मार्ट कंपनीच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकाश थविल यांच्या बदलीनंतरही स्मार्ट कंपनीचा अनागोंदी कारभार कायम असेल तर ते निषेधार्ह्य आहे, असे नमूद करत स्मार्ट कंपनीच्या या गोंधळाविषयी चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन केल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या