Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकरोनाने शिक्षणावर संक्रांत!

करोनाने शिक्षणावर संक्रांत!

दिंडोरी । संदिप गुंजाळ | Dindori

पुन्हा एकदा करोनाने (corona) डोकं वर काढलं आहे. शहरातील वाढती संख्या ही नक्कीच चिंताजनक आहे. वाढत्या करोनामुळे पुन्हा शाळा (school) बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. आणि पुन्हा सुरू झाले ऑनलाईन शिक्षण (online education). शहरातील मुलांना सर्व सुखसोयी उपलब्ध असल्याने त्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होते.

- Advertisement -

परंतु ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणावर मात्र पुन्हा संक्रांत आली आहे. शहरात करोना वाढल्यावर ग्रामीण भागातील शाळा बंद करण्यात कोणते शहाणपण ? शहरातील वाढती करोना ग्रामीण भागातील शाळा बंद केल्यावर कमी होते की काय? असा संतप्त सवाल ग्रामीण भागातून उपस्थित केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे शाळा बंद पडल्या होत्या.

जगावे कसे हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आ वासून उभे असतांना आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल (mobile) उपलब्ध कुठून करायचा हा मोठा प्रश्न पालकांसमोर होता. मोबाईल कुठुनतरी उपलब्ध केला तरी मोबाईल कंपन्यांनी वाढवलेली रीचार्जची (Recharge) किंमत ही नक्कीच सर्व सामान्य नागरिकांची दमछाक करणारी आहे. मोबाईलला रीचार्ज मारणे शक्य होत नसल्याने मुलांना शिक्षण द्यावे कसे हा प्रश्न ग्रामीण भागातील पालकांसमोर उपस्थित झाला होता.

परंतु नुकत्याच काही दिवसांपासून शाळा (school) पुन्हा सुरू झाल्याने पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. शाळाही गजबजलेल्या दिसल्या. ऑनलाईन शिक्षणापेक्षा (online education) प्रत्यक्षात शिक्षण घेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी (students) आनंद व्यक्त केला. परंतु तो आनंद क्षणीक ठरला. पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आणि शासनाने पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.

परंतु करोना (corona) शहरात वाढत असताना ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचा थाट कशासाठी? ग्रामीण भागातील शाळा बंद केल्यावर शहरातील करोना रूग्ण कमी होतात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात जिथे करोनाचा लवलेशही नाही तेथेही शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे (students) शैक्षणिक नुकसान करणे हे कितपत योग्य आहे.

ग्रामीण भागातील शाळा जवळपास मागील दोन वर्षापासून बंद होत्या. यात विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले.शहरी भागाच्या तुलनेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील पाहिजे ते वातावरण व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाही. पालकांमध्ये जागरूकता नाही. अशिक्षित पालकवर्ग मुलांचा अभ्यास घरी करून घेतीलच कसे हा मोठा प्रश्न.

दोन वेळची पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न पालकांसमोर असतांना मुलांसाठी ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता तरी कुठून करणार हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. मुलांकडे आवश्यक साधने नसल्यामुळे शिक्षणापासून दिर्घकाळ बाजुला राहणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने नक्कीच घातक ठरेल. ग्रामीण भागातील पालक मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक साधने नसल्यामुळे शेतीच्या कामात गुंतवतात. जर शिक्षणाचा विसर पडून मुलांना कामाची आवड निर्माण झाली तर नक्कीच ते घातक ठरेल यात काही शंका नाही.

शाळा बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीत ठेवणे आवश्यक आहे. ज्या गावात करोनाचे रूग्ण आहे तेथे आवश्यक त्या खबरदारी घेणे आवश्यक आहेच परंतु ज्या गावात करोनाचा लवलेशही नाही अशा ठिकाणी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा हट्ट कशापायी ? शहरात राहून ग्रामीण भागातील शाळांचा निर्णय घेणे किंवा शाळेच्या परिस्थितीचा अंदाज लावणे कितपत योग्य ठरेल? हे नक्कीच न पचणारे असेच म्हणावे लागेल.

शहरातील मुलांचा अभ्यास त्यांचे शिक्षित पालक घरी घेतील परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणार तरी कोण? शाळा बंद करून शिक्षकांना शाळेत येऊन बसण्याचा निर्णय झाला खरा पण यात कोणते शहाणपण? जर ऑनलाईन शिक्षण देणे हाच पर्याय जर शिक्षकांसाठी ठेवला असेल तर शाळेत येवून ऑनलाईन शिक्षण देण्यापेक्षा शिक्षक त्यांच्या घरी बसुन देखील ऑनलाईन शिक्षण देवू शकत नाही का?

मग शिक्षकांना शाळेत बोलवून विद्यार्थ्यांना घरी बसवण्याचा निर्णयामागचे हित काय हे न उलगडणारे कोडे आहे. कोणताही निर्णय घेतांना सर्वसमावेशक विचार होणे अपेक्षित आहे. परंतु शाळेच्या बाबतीत घेतलेला निर्णय फक्त शहराची परिस्थिती घेऊन घेतलेला निर्णय दिसत आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्था पुर्णपणे कोलमडली असेच म्हणावे लागेल.

या निर्णयामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्याची शक्यता आहे.शाळेपासुन जितका काळ विद्यार्थी दुर राहिले तितकेच त्याची लेखन, वाचन ,ग्रहण क्षमता कमी होईल हे देखील तितकेच महत्त्वाचे.ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण पुरेसे मिळत नसल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दरी निर्माण होत आहे.ऑनलाईन शिक्षण पोहोचू न शकणार्‍या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करताना परिणाम जाणवणार असल्याने होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन शाळेबाबत फेरविचार होणे अपेक्षित आहे.मागील दोन वर्षात शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे पूर्ण प्रयत्न झाले पण त्यात शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण झाली असं म्हणता येणार नाही. करोना काळात लग्नसमारंभ व इतर समारंभ, रेस्टॉरंट, मॉल आदींसाठी वेगळी नियमावली तयार करण्यात आली. परंतु तसीच नियमावली ग्रामीण भागातील शाळेच्या बाबतीत देखील घेता येवू शकते.

ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण देण्यात असंख्य अडचणी असुन विदयार्थ्यांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नसणे, रेंज समस्या, तंत्रज्ञानाचे अज्ञान यामुळे ऑनलाईन माध्यमातून शिक्षण ग्रामीण भागात निरूपयोगी आहे. कोविड नियमांचे पालन करून शाळेतच मर्यादित विदयार्थी संख्येत ऑफलाईन पद्धतीने अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू ठेवावी

सचिन वडजे, तालुकाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

- Advertisment -

ताज्या बातम्या