अट्टल गुन्हेगार जेरबंद
नाशिक

अट्टल गुन्हेगार जेरबंद

पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त

Abhay Puntambekar

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सेवक जेलरोड येथे गस्त घालत असताना त्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने जेलरोड परिसरात एका ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त केला.

व.पो.नि. सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि. विलास शेळके, हवालदार विशाल पाटील, सुनील कोकाटे, संतोष घुगे, जनार्दन गायकवाड, नीलेश विखे, जुनेद शेख, सोमनाथ जाधव यांनी ही कामगिरी केली. हवालदार विशाल पाटील यांना जेलरोड परिसरात राहणारा अर्जुन गोरख धोत्रे हा मिक्सरचे पार्ट विक्री करण्यासाठी आलेला दिसला तेव्हा पाटील यांनी धोत्रेला संशयावरून ताब्यात घेतले.

त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने जेलरोड परिसरातील विठ्ठलनगर येथे सात महिन्यांपूर्वी चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्या राहत्या घरी जाऊन तपासणी केली असता घरामध्ये सोन्याचा हार, अंगठी असा सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचा चोरी केलेला ऐवज मिळून आला. सदरचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, उपायुक्त विजय खरात यांनी अभिनंदन केले. दरम्यान, धोत्रे यास न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com