Thursday, April 25, 2024
Homeनगरप्रशासनास अंधारात ठेऊन इराणी नागरिकाचे वास्तव्य

प्रशासनास अंधारात ठेऊन इराणी नागरिकाचे वास्तव्य

नगरमधील हॉटेल चालकाने दिली साथ ः सिंग रेसिडेन्सीविरूद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. शहरातील सर्व हॉटेल बंद असताना हॉटेल सिंग रेसिडेंसीमध्ये एका इराणी नागरिकाला प्रशासनाला अंधारात ठेऊन प्रवेश देण्यात आला. परंतु तो आता हॉटेलमधून निघून गेल्याची घटना समोर आली आहे.
इराणी नागरिकाविषयी माहिती शासकीय यंत्रणेपासून लपवून ठेवल्याने, बंदी असताना प्रवेश दिल्याने, हॉटेलचे मालक व मॅनेजर यांच्या विरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात हॉटेल मालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना संशयित इराणी नागरिकाचा पोलीस शोध घेत आहे. हॉटेल सिंग रेसिडेन्सीचे मालक कंवलजीत सिंग गंभीर (वय- 47 ), मॅनेजर रुपेश सोहनलाल गुलाटी (वय- 23 रा. तारकपुर), एक इराणी नागरिक अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संतोष यशवंत मगर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगळवारी (दि. 24) पहाटे तीन वाजता तारकपूर येथील सिंग रिसिडेन्सी हॉटेलमध्ये एका इराणी व्यक्तीने भारतीय असल्याच्या सांगून वास्तव्य केले. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये इराणी नागरिकाची चुकीची माहिती भरण्यात आली. यामध्ये मोबाईल क्रमांक चुकीचा नोंदविला. सदर इसमाने ओळख पुरावा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स दाखविले नसताना सुध्दा फाँर्ममध्ये ड्रायव्हिंग लायसन्सचा उल्लेख केला आहे.
त्याच प्रमाणे इराणी नागरिकाने ओळखपत्र म्हणून इराणीयल नागरिक असल्याचे नमूद असलेले कमर्शियल कार्डची झेरॉक्स दिलेली असतानी तो भारतीय नागरिक असल्याचे फॉर्ममध्ये नमुद केले आहे. सकाळी नऊ वाजता तो हॉटेलमधून निघून गेला. एका वाहनातून तो आला होता व जाताना त्याच वाहनातून गेला. त्या वाहनाचा उल्लेख हॉटेल रजिस्टरमध्ये नाही.
कोरोना विषाणू रोगाच्या पाश्वभूमीवर परदेशी नागरिकांची माहिती प्रशासनास कळवणे हॉटेल मालकांला बंधन कारक आहे. इराणी नागरिकापासून जीवितास धोकादायक असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरणे संभव असून ते त्यांना स्वतःला माहीत असताना इराणी नागरिकाविषयी माहिती शासकीय यंत्रणेपासून लपवून ठेवल्याने हॉटेलचे मालक व मॅनेजर यांच्यासह परदेशी नागरिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायवट करीत आहेत.
- Advertisment -

ताज्या बातम्या