Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड सेंटर सुरू करा

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड सेंटर सुरू करा

नाशिक । प्रतिनिधी

पंधरा दिवसांमध्ये जिल्ह्यात कोविड-१९ संसर्गाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.त्यातच ग्रामीण भागात करोनाने मृत्यूचे प्रमाण वाढले आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड सेंटर सुरू करावेत, अशी मागणी भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी स्थायी समिती बैठकीत केली.

- Advertisement -

परंतु इतर तातडीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठीची व्यवस्था बघून किमान ५० टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले, तर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

जि.प.च्या स्थायी समितीची आॅनलाइन सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ८) झाली. सभेत डॉ. कुंभार्डे यांनी ग्रामीण भागातील करोना लाटेचा प्रादुर्भाव मोठा असून, रुग्णांना बेड मिळत नसल्याचे सांगितले. आॅक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यातच रेमडीसिवर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याने ते मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड रुग्णास उपचार देण्यास सुरुवात केल्यास एक हजार बेड उपलब्ध होऊ शकतात, असेही डॉ. कुंभार्डे यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ही कोविड सेंटर करावीत, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र कोविड सेंटर केल्यास नॉन कोविड रुग्णास उपचार मिळणार नाहीत, प्रसूतीसाठी आलेल्यांचे हाल होतील, असे डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले. बेड वाढविणे आवश्यक आहे. यासाठी ५० टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड सेंटर सुरू करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट करत यावर लवकरच कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात ११० प्राथमिक आरोग्य केंद्र असून, या सर्व केंद्रांमध्येही कोविड रुग्णांवर उपचार सुरू केल्यास ग्रामीण भागात जवळपास हजार बेड उपलब्ध होतील. त्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक गॅस टँक व दहा आॅक्सिजन सिलिंडर पुरवावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, सभापती संजय बनकर, अश्विनी आहेर, सुरेखा दराडे, सुशीला मेंगाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, स्थायी समिती सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, महेंद्रकुमार काले, भास्कर गावित, सविता पवार, छाया गोतरणे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या