करोना उपचार करताना 30 डॉक्टर पॉझिटिव्ह

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील डॉक्टर जीव धोक्यात घालून करोनाग्रस्तांना सेवा देत आहेत. सेवा करणार्‍या 30 डॉक्टरांना करोनाची बाधा झाली तर दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

खासगी हॉस्पिटलमधून 1 हजार 700 बाधित ठणठणीत होऊन घरी पोहचले. 70 जणांचा मृत्यू झाला. मृतांचे प्रमाण नगण्य असतानाही खासगी डॉक्टरांना बिलासंदर्भात नाहक टार्गेट केले जात असल्याची खंत आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांनी व्यक्त केली आहे.

आयएमए या डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. आठरे व सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी पत्रक प्रसिध्दीस देत डॉक्टरांची बाजू मांडली आहे. यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात काम करणे धोक्याचे असतानाही खासगी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स आपला व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून करोना रुग्णांवर उपचार करत आहेत.

प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पेशंट अत्यवस्थ व मृत्यू होण्यामागे आजाराकडे दुर्लक्ष व उशीरा हॉस्पिटलमध्ये दाखल होणे हे एक मुख्य कारण आहे. नगरधील मार्चमधील रुग्ण संख्या आणि सध्याची रुग्ण संख्या यात मोठी तफावत आहे.

निष्काळजीपणामुळे ही संख्या वाढत चालली आहे. त्याबाबत विचार करून काळजी घेण्याऐवजी रुग्णांवर जीव धोक्यात घालून उपचार करणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांवर आगपाखड करण्यात येत आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सुरुवातीच्या काळात सिव्हील, बुथ आणि एम्स या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. त्या काळात सिव्हील आणि बुथमध्ये संघटनेच्या मेडिसीन एमडी, भूलतज्ज्ञांनी आयसीयूमध्ये सेवा दिली. जशीजशी रुग्ण संख्या वाढू लागली, तशी या रुग्णालयांतील बेडची संख्या कमी पडू लागली. त्यामुळे नोबेल, स्वास्थ्य, साईदीप यांनी खासगी कोव्हिड रुग्णालय सुरू केले.

त्यापाठोपाठ मॅककेअर, श्रीदीप, साईएशियन यांनी पतियाळा हाऊसध्ये कोव्हिड उपचार केंद्र सुरू केले. या काळात कोव्हिड व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार रखडू नयेत, याचीही काळजी घेण्यात आली. विशेषत: गरोदर स्त्रियांवरील उपचार आणि प्रसूतीसााठी उपाययोजना करण्यात आल्या.

सिव्हील हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल होणार्‍यांवर विखे पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार आणि प्रसुती आयएमएच्या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मदतीने करण्यात आल्या. लहान मुलांनाही त्यांच्या आजारावरील उपचार मिळावेत यासाठी बालाजी आणि सिद्धीविनायक येथे तपासणी करण्यात आली. रुग्ण वाढल्याने एक, दोन नव्हे तर तब्बल सोळा रुग्णालयांमध्ये कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले.

यात आयुर्वेद आणि होमीओपॅथिक डॉक्टरांनीही खांद्याला खांदा लावून सेवा दिली. करोना हा सर्व जगासाठी नवीन आजार असून त्यासाठी अजूनपर्यंत औषध सापडले नाही. त्यामुळे डॉक्टरांना देखील यामुळे उपचारासाठी मर्यादा आल्या आहेत.

असे असतानाही डॉक्टर पूर्ण प्रयत्न करून देखील रुग्ण दगावल्यास त्याचा दोष डॉक्टरांना दिला जातो. त्यातून डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण होते. या गोष्टींचा विचार आरोप करताना केला जात नसल्याची खंत डॉ. आठरे व डॉ. वहाडणे यांनी व्यक्त केली आहे.

करोनाग्रस्तांवर उपचार करताना आयएमएचे तीसहून अधिक डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय कोव्हिड पॉझिटिव्ह झाले.त्यात मेडिसिनचे 6, बालरोगतज्ज्ञ 4, भूल तज्ज्ञ 4, कान नाक तज्ज्ञ 2, स्त्रिरोग तज्ञ 4, डॉक्टर पॉझिटिव्ह आले.

शहरातील खाजगी कान, नाक,घसा तज्ज्ञांनी करोना चाचणी कामी लागणार्‍या घश्यातील स्त्राव घेण्यास प्रशासनाला मोलाची मदत केली. हे काम करताना 2 डॉक्टर बाधित झाले. कर्जत येथील डॉ. विलास काकडे यांना रुग्ण सेवा करताना जीव गमवावा लागला. तसेच निमा संघटनेचे डॉ. जगताप व डॉ. गाजवे यांनाही आपला प्राण गमवावा लागला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *