Thursday, April 25, 2024
Homeनगरकरोना पार्श्वभूमीवर विज्ञानाचा 50 टक्के अभ्यासक्रम कमी करा

करोना पार्श्वभूमीवर विज्ञानाचा 50 टक्के अभ्यासक्रम कमी करा

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

करोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सध्या शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत.

- Advertisement -

त्यामुळे चालू शैक्षणिक ( सन 2020-21 ) वर्षात शालेय विज्ञानचा 50 टक्के अभ्यासक्रम कमी करावा, अशी मागणी विज्ञान महामंडळाचे राज्याध्यक्ष दत्तात्रय आरोटे यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाने दि. 23 नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र अनेक ठिकाणी विविध कारणांनी शाळा सुरु होवू शकल्या नाहीत. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सध्या शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. प्रात्यक्षिकांशिवाय विज्ञान विषयाचे अध्यापन करणे शक्य होत नाही. अशाही परिस्थितीत शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेतच.

प्राप्त स्थितीत वर्गाशिवाय व प्रयोगशाळेशिवाय विज्ञान विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नाही. दि. 1 जानेवारी 2021 पासून शाळा नियमित सुरु होण्याची शक्यता आहे. एसएससी बोर्डाची परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार असून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा व इतर विषयांच्या तोंडी परीक्षा तसेच अन्य लेखी काम पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे.

याचाच अर्थ केवळ तीन महिन्यात विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम शिकवावा लागणार आहे. ऑनलाईन तासांना हजर असणारे व हजर नसणारे विद्यार्थी यांचा मेळ घालताना शिक्षकांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक सन 2020-21 वर्षात शालेय विज्ञानचा 50 टक्के अभ्यासक्रम कमी करावा, अशी मागणी विज्ञान महामंडळाचे राज्याध्यक्ष दत्तात्रय आरोटे यांनी केली. याबाबत आमदार डॉ. सुधीर तांबे यांना निवेदन देण्यात आले.

प्रसंगी विज्ञान संघटनेचे पदाधिकारी प्राचार्य विजय कोडूर, प्राचार्य मुकूंद डांगे, उपप्राचार्य भारत सातपुते, विज्ञान शिक्षक विनायक क्षीरसागर उपस्थित होते. याप्रश्नी आमदार डॉ. सुधीर यांनी आपण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी तातडीने चर्चा करू, अशी ग्वाही दिल्याचे श्री. आरोटे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या