Friday, April 26, 2024
Homeनाशिककरोना बाधित रूग्णांचे हाल थांबवा

करोना बाधित रूग्णांचे हाल थांबवा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेल्या रूग्णालयांमध्ये करोना बाधित रूग्णांवर त्वरीत उपचार सुरू करावेत.

- Advertisement -

जी रूग्णालये उपचारास नकार देत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच बाधित रूग्णांना औषधे उपलब्ध करून देत चांगले उपचार व्हावेत, अन्यथा तालुका काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी दिला आहे.

मनपा आयुक्तांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देत बाधित रूग्णांच्या होत असलेल्या हेळसांडीकडे लक्ष वेधले. जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेले रूग्णालय बाधित रूग्णांना उपचारासाठी घेत नाही.

मनपा आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली या रूग्णालयांतर्फे केली जात आहे. त्यामुळे सामान्य रूग्णांचे हाल होत आहे. खाजगी रूग्णालयांमध्ये बाधितांची आर्थिक पिळवणूक केली जात असून भरमसाठ बिल आकारले जात असल्याने अशा रूग्णालयांवर मनपा प्रशासनाने वचक ठेवणे गरजेचे आहे.

औषधे बाहेरून वाढीव किंमतीत विकत आणावी लागत असल्याचे बोलले जात आहे. इंजेक्शन व औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देत बाधित रूग्णांचे हाल थांबवावेत. मनपा प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करीत असल्याची चर्चा शहरात होत आहे.

बाधित रूग्णांचे होत असलेले हाल न थांबल्यास काँग्रेस तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशारा डॉ. ठाकरे यांनी दिला. उपायुक्त नितीन कापडणीस यांनी निवेदन स्विकारले. शिष्टमंडळात नितीन बच्छाव, वाय.के. खैरनार, सतिष पगार आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या