Thursday, April 25, 2024
Homeजळगाव48 तासात हायरिस्क व्यक्तिंचा शोध घेतल्यास नियंत्रण

48 तासात हायरिस्क व्यक्तिंचा शोध घेतल्यास नियंत्रण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींचा 48 तासात शोध घ्या.

- Advertisement -

तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्राची अंमबजावणी करण्यासाठी मायक्रो झोन तयार केले पाहिजे. जेणे करुन संशयित रुग्ण शोधण्यास मदत होईल अशा सूचना आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्या.

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात डॉ अर्चना पाटील यांनी जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांचेशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश दिघे आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ.पाटील पुढे म्हणाल्या की, प्रतिबंधात्मक क्षेत्रात सर्वेक्षण करतांना सारी व सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण सापडले पाहिजेत.

कर्मचार्‍यांना तपासणीसाठी देण्यात येणारे थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर योग्य पध्दतीने काम करीत आहेत का याचीही तपासणी करावी.

कर्मचार्‍यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या कामाचे समान वाटप करा. तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक यांनी समन्वय राखून आपल्या तालुक्यातील कामाचे नियोजन करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

जिल्हा शल्यचिकीत्सकांसह आरोग्य अधिकार्‍यांनी कोविड सेंटला भेटी द्या

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियमितपणे प्रतिबंधात्मक क्षेत्र, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेटी द्याव्यात. त्याचबरोबर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये जम्बो सिलेंडरची तरतुद करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा

सध्या राज्यात ऑक्सिजनचा साठा कमी असल्याने उपलब्ध ऑक्सिजनचा वापर योग्य पध्दतीने होण्यासाठी ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा.

याकरीता प्रत्येक ठिकाणी दोन स्वतंत्र नर्सची नियुक्ती करावी. रुग्णाच्या आवश्यतेनुसारच त्याला ऑक्सिजन दिला गेला पाहिजे.

तसेच दर चार तासांनी प्रत्येक रुगणांची ऑक्सिजन पातळी तपासावी. उपलब्ध ऑक्सिजन वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर रुग्णांची रक्त तपासणी दैनंदिन करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत आरोग्य संचालक समाधानी

लसीकरण करतांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याच्या सूचना देतांनाच कोरोना सोबतच डिलीव्हरीचे पेशंट, अपघात व दैनंदिन तपासणीच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये असेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने केलेल्या तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या