Thursday, April 25, 2024
Homeशब्दगंधजनतेच्या हितासाठी माणूस माणूस जोडणारा, पोलीस-साहित्यिक-कलावंतांचा स्नेहमेळावा

जनतेच्या हितासाठी माणूस माणूस जोडणारा, पोलीस-साहित्यिक-कलावंतांचा स्नेहमेळावा

अधिकारी कल्पक, समंजस आणि वेगळ्या वाटेने विचार करणारा असला, तर तो या सर्वांतून नवी वाट शोधतो. नवे मित्र जोडतो. नवी कुमक तयार करतो. ही कुमक प्रत्यक्ष लढाईत उतरत नसेलही. पण, ती अदृष्यपणे काम करते. समाजस्वास्थ्य सुदृढ ठेवते. असा एक अभिनव प्रयोग नाशिक परीक्षेत्र विशेष पोलीस महासंचालक, आयपीएस अधिकारी डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या माध्यमातून नुकताच जळगावी केला.

देशात, राज्यात सर्वत्र एक प्रकारचे अस्वस्थ वातावरण निर्माण झालेले आहे. त्याला कोरोनाची पार्श्वभूमी असली, तरी नव्याने निर्माण झालेला एक धार्मिक उन्माद, हेदेखील एक कारण आहे. कोरोनाने जगण्याचे क्षणभंगुरत्व सिध्द करत, मृत्यूचं भयाण आणि विक्राल रुप दाखवले. दुसर्‍या बाजूला धर्मांधतेने समाजासमाजामध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कोरोनाच्या बिकट संकटातून बाहेर पडताना, खरंतर माणसामाणसांनी आपले जाती, धर्म, पंथ, राजकीय पक्ष विसरुन मानवता धर्म जोपासायला हवा. तो जपायला हवा. वर्धिष्णू करायला हवा. मात्र, निवडणुका आणि सत्तेच्या स्पर्धेत, आपण संकटातही स्वार्थाचीच री ओढतो. आपलीच पोळी भाजून घ्यावी, यासाठी जो तो पुढे असतो. यातून एकमेकांबद्दल अविश्वास वाढतो, गैरसमज पसरतो, अशांतता पसरते. जिचा साहजिकच असामाजिक तत्त्वे फायदा उचलतात.

याचा सर्वाधिक ताण पडतो, तो पोलीस यंत्रणेवर. त्यांची मुळातच तोडकी संख्या. कायदा सुरक्षा देण्यापेक्षा, इतर कामावर अकारण खर्ची पडणारी शक्ती, यामुळे हा ताण वाढतच जातो. मात्र, अधिकारी कल्पक, समंजस आणि वेगळ्या वाटेने विचार करणारा असला, तर तो या सर्वांतून नवी वाट शोधतो. नवे मित्र जोडतो. नवी कुमक तयार करतो. ही कुमक प्रत्यक्ष लढाईत उतरत नसेलही. पण, ती अदृष्यपणे काम करते. समाजस्वास्थ्य सुदृढ ठेवते. असा एक अभिनव प्रयोग नाशिक परीक्षेत्र विशेष पोलीस महासंचालक, आयपीएस अधिकारी डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या माध्यमातून नुकताच जळगावी केला.

- Advertisement -

कर्तव्य कठोर, धाडसी पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. पाटील हे मुळात साहित्यिक आहेत. त्यांच्या अनेक साहित्यकृतींच्या, अनेक आवृत्याही निघाल्या आहेत. त्यामुळे समाजात वावरताना फक्त पोलिंसींगच न करता, पोलिसांनी जनतेचे मित्र व्हावं, या विचारांवर त्यांचा ठाम विश्वास आहे. गुन्हेगाराला माणूस म्हणून, वैयक्तिक नष्ट करायचे नाही, तर त्याची वाईट वृत्ती नष्ट करायची आहे. गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करायचे आहे. यासाठी मध्यमवर्गीय, सुशिक्षित, सुजाण नागरिकाला, पोलीस आपले मित्र वाटावेत, म्हणून त्यांनी जळगावच्या एस. पी. ऑफिसजवळील आयपी मेसमध्ये, साहित्यिक कलावंत, समाजसेवक यांचा एक स्नेहमेळावा घेतला.

समाजातील डॉक्टर, इंजिनिअर, लेखक, कवी, चित्रकार, नाट्यकलावंत, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना, त्यांनी जिल्हा कार्यालयात सन्मानाने बोलवून, त्यांच्याशी सुखद संवाद साधला. त्यांना बोलतं केलं. समाजमनाचा कानोसा घेतला. सकारात्मकतेचं एक पाऊल पुढे टाकलं. गैरसमज, अज्ञान, भीतीने मध्यमवर्गीय माणूस पोलिसांपासून दूर राहू पाहतो. त्या मानसिकतेचे, बंद झालेलं दार, डॉ. पाटील यांनी कल्पकतेने किलकिलं केलं. आणि, एक आश्वासक प्रकाश किरण त्यातून बाहेर आलाय, असं मला वैयक्तिक वाटतं.

या बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मलाही प्रत्यक्ष बोलावून घेत हा अनुभव घेण्याची संधी दिली. या माध्यमातून जिल्ह्यातील काही सकारात्मक विचार करणार्‍या साहित्यिकांना, कलावंतांना भेटता आलं. आम्ही या निमित्ताने आमच्या भावना, अपेक्षा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांपर्यंत पोहचवू शकलो. त्याच्यातला संवादाचा पूल झालो. याचा मला मनस्वी आनंद आहे. हा माझ्यासाठी हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवावा, असा अविस्मरणीय अनुभव ठरला.

एस. पी. ऑफिसमधून दुपारी जेव्हा फोन खणखणला तेव्हा खरं भीतीच वाटली, मात्र, ते एका मेळाव्याचं निमंत्रण आहे, हे ऐकून आश्चर्याचा एक सुखद धक्का बसला, असं उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियेत नोंदविलं. सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस धोपट मार्गाने जगतांना, आपलं कुटुंब आणि आपलं काम यात गुंतलेला असतो. तो सहसा उपद्रवी कामापासून दूर राहतो. नको ती कटकट, दगदग अशी त्याची भूमिका असते. त्याच्याही मनात असंख्य प्रश्न असतात. ते त्याला सतत अस्वस्थ करत असतात. मात्र, चारचौघात कुणाला ते विचारण्याचे धाडस त्याच्यात नसते, ती त्याची प्रकृतीही नसते.

कोलाहलापासून स्वतःला दूर ठेवणारी, समाजाची काजळी आपल्या अंगाला, कपड्यांना लागू नये म्हणून, स्वतःला जपणारी, साधन सुचिता पाळणारी ही मंडळीला, एसपी आणि महापोलीस निरीक्षक साहेब आपल्याशी बोलू इच्छितात या जाणिवेचंच अप्रूप वाटलं. उपस्थित सर्व मान्यवर मनाची कवाडं उघडून बोलू लागली. खुलू लागली. परिचयातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची, कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची ओळख झाली. समाजाच्या मुख्य प्रवाहात सातत्याने काम करणारी, ही माणसं मोठ्या पोलीस अधिकार्‍यांच्या आपुलकीने आणि आदरातिथ्याने भारावून गेले.

पोलीस हा कणखर, शिस्तप्रिय, कठोर असतोच. मात्र, त्यांच्या आतही एक सहृदयी, संवेदनशील माणूस, माणुसकीची जपणूक करणारा साहित्यिक दडलेला असतो, ह्याचं हृद्यदर्शन या मेळाव्यात घडलं.

डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत त्यांची शैक्षणिक, पोलीस खात्यातील कारकीर्द आणि साहित्यिक वाटचाल विषद केली. तेव्हा उपस्थितांना एका सुजाण, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचे दर्शन झाले. त्यांनी एम. ए. एल. एल. बी, बी. ई, जर्नालिझम, फोरेन्सिक सायन्स, ह्युमन राईट्स, क्रिमिनॉलॉजी यांचा अभ्यास केला असून, क्राईम डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शनमध्ये पी. एच. डी. प्राप्त केली आहे. महत्वाची पदं सांभाळतांना शिक्षणाच्या विविध शाखांमधून आपण कसे समृध्द होत गेलो, याचा त्यांनी सांगितलेला अनुभव रोचक आणि अभिनंदनीय ठरला.

अनेक गुन्ह्यांच्या उकलीचं रहस्य त्यांनी खोललं. ते आपल्या कथांचे विषय कसे झालेत ते मांडलं. राष्ट्रपती पोलीस पदक, यूएन शांतता पदक, पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाचं पीटीसी पारितोषिकं हे त्यांचं नेत्रदीपक यश. ड्रग्स माफियांवर कारवाई, जळगाव सेक्स कँडल तपास, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासाचा थरार यातला त्यांचा सहभाग त्यांच्याच मुखातून ऐकणं म्हणजे एक पर्वणीच होती.

गुन्हेगार हाच समाजात गुन्हे करतो असं नाही, तर काही व्हाईट कॉलर माणसंही छुप्या पध्दतीने गुन्ह्यात सहभागी असतात. त्यांना शोधणं, त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई करणं जिकिरीचं असतं, असं पाटील म्हणाले. समाजातील सज्जन वृत्ती ही पोलिसांना वेळोवेळी मदत करतेच. मात्र, ते सहज, बिन्धास्त पुढे येत नाही. कारण, पोलिसी चक्रव्यूह. परंतू पोलीस हा समाजासाठीच असतो. ही भावना तळागाळात पोहचत नाही. या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्या कामात लेखक, कवी, पत्रकार, डॉक्टर, इंजिनिअर आणि समाजसेवक यांनी आनंदाने सहभागी व्हावे असे आवाहन, त्यांनी या निमित्ताने केले.

उपस्थितांचा मनाचा कानोसा त्यांनी जाणून घेतला. त्यांच्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांना सकारात्मक आश्वासन दिलं. पोलिसांमधील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवणारे उपक्रम घेणार असल्याची ग्वाही दिली. महाराष्ट्र पोलिसात 300 लेखक, कवी असल्याचे सांगत, त्यांचे साहित्य संमेलन मुंबईत झाल्याचे सांगून, लवकरच नाशिक येथे दुसरं पोलीस साहित्य संमेलन घेण्याचं सुतोवाच केलं. त्या संमेलनाचं आमंत्रण त्यांनी उपस्थितांना देऊन, एक सुखद धक्का दिला. पोलिसांच्या साहित्यिक कलागुणांचं दर्शन घ्यावे. त्यावर प्रकाश टाकावा.

त्यांच्या प्रकाशवाटा मोकळ्या कराव्यात, ही पोलीस महानिरीक्षकांची लिहित्या हातांसाठी, लिहित्या हातांकडून केलेली इच्छा, म्हणजे जणू पोलीस कर्मचार्‍यांसाठी मागितलेलं पसायदानच होत, असं मला वाटतं.

या उपक्रमाचे निमित्त बीजी शेखर पाटील असले, तरी त्याचे मुख्य आयोजक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस बळाच्या मर्यादीत संख्येचं वास्तव मांडून सुजाण, जागृत नागरिक हेच पोलिसांचे विस्तारित हात असतात असं नमूद केले. त्यासाठी सर्वांना सकारात्मक सहकार्याचं आवाहन केलं. प्रत्येक नागरिक जेव्हा पोलिसाचा मित्र होईल, तेव्हा पोलिसांचा ताण आपोआप कमी होऊन, त्याच्या गुन्हे शोध आणि गुन्हेगारीला शिक्षा होणं याचा आलेख उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलीस मित्र होणं हे लपविण्याचं नाही, तर अभिमानाने सांगण्याची बिरुदावली झाली पाहिजे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या साहित्यिक कलावंत मेळाव्याला शहरातील व जिल्ह्यातील अनिल जोशी, शिरीष बर्वे, अ‍ॅड. जमिल शेख, डॉ. रवी महाजन, डॉ. रेखा महाजन, युसुफ मकरा, भरत अमळकर, चेतन ढाके, अमर कुकरेजा, डॉ. राधेश्याम चौधरी, चंद्रकांत भंडारी, सौ. मायाताई धुप्पड, सौ. संगीताताई पाटील, डॉ. केतकी पाटील, प्रा. बी.एन.चौधरी, डॉ. मिलिंद बागूल, युवराज माळी, डॉ. नीरज शाम देव, डॉ. क्षमा सुबोध, विनोद ढगे, हर्षल पाटील, दिनेश दगडकर, अ. फ. भालेराव, राजू बाविस्कर, भास्कर चव्हाण, गोविंद पाटील, मोरेश्वर सोनार, अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी एकत्र आले होते.

कल्पनेतील इमारती प्रत्यक्षात साकार करणारे इंजिनियर, आर्किटेक्ट, जनतेचं आरोग्य जपणारे धन्वंतरी, नाटक प्रत्यक्षात साकरणारे नाट्यकर्मी, त्यासाठी लागणारं साहित्य लिहिणारे लेखक, कवी, चित्रकार, समाजसेवेत रमणारे समाजसेवक, शिक्षणासह सहकारातील धोरणकर्ते, निष्णात वकील, उत्तम मॅनेजर, इव्हेंट मॅनेजर आणि पडद्यामागे राहून यशाचं श्रेयही दुसर्‍यांना देणारी मोठ्या मनाची माणसं, ही या मेळाव्याची श्रीमंती ठरली. अनेकांना हा संदेश उशीरा मिळाला, काहींना त्यात समन्वय साधता आला नाही.

कहींची वेळेची मर्यादा आडवी आली. यामुळे अनेकजण मेळाव्याला येऊ शकले नाहीत. मात्र, या मेळाव्याचे वृत्त व फलश्रुती कळाल्यावर, त्यांनी संधी हुकल्याची हळहळ व्यक्त केली. ती भविष्यात दूर करता येईल. यासाठी अशा मेळाव्याची पूर्व कल्पना दिल्यास, ते अधिक यशस्वी होतील.

व्यक्तिगत पातळीवर यातील एखाद दुसर्‍याशी प्रासंगिक भेटी झालेल्या होत्या. समाज माध्यमांवर एकमेकांना ओळखतही होतो. मात्र, एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर, इतकी विविध गुणसंपन्न आणि सकारात्मकता जपणारी माणसं, एकाच ठिकाणी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असावी. असं म्हणतात, की चहूबाजूने सकारात्मकता आणि ती पेरणारी सकारात्मक माणसं एकत्र आली, की त्यांची एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. जी वातावरणाला भारीत करते आणि निसर्ग शक्ती त्याचे चांगले परीणाम दाखवायला सुरवात करते. त्याची सुरुवात या निमित्ताने झालीये, असे मला वाटतं. पहिलं पाऊल तर पडलंय. ध्येय निश्चित आहे. म्हणजे, यशाचा पल्ला गाठता येईलच.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे कार्यप्रवण, उपक्रमशील आहेत. ते हा वसा निष्ठेने असाच पुढे नेतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. असे उपक्रम हे निव्वळ प्रासंगिक न राहता, ते नियमित व्हायला हवेत. ज्या योगे पोलीस आणि जनता यांच्यात सौहार्द वाढेल. भीड चेपली जाईल. संवाद सुरु होईल आणि काहीतरी मंगल पदरात पडेल. ही कल्पना प्रत्यक्षात आणणार्‍या डॉ. मुढे यांचे, यानिमित्ताने मी व्यक्तिगत अभिनंदनच करतो.

(लेखक सेवानिवृत्त मुख्याध्यापक, साहित्यिक, व्यंगचित्रकार, पत्रकार, समिक्षक आहेत)

‘देवरुप’, धरणगाव, जि.जळगाव-425105

- Advertisment -

ताज्या बातम्या