Friday, April 26, 2024
Homeनगरमहापालिकेचे आर्थिक नियोजन ढिसाळ

महापालिकेचे आर्थिक नियोजन ढिसाळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागरिकांच्या अत्यावश्यक आणि तातडीच्या सुविधेसाठी काम करणार्‍या छोट्या ठेकेदारांची मागील सात-आठ वर्षांपासूनची देयके मनपाने अजूनही अदा केलेली नाहीत.

- Advertisement -

यामुळे सुमारे शंभरहून अधिक ठेकेदार आर्थिकदृष्ट्य मोडून पडण्याच्या मार्गावर आहेत. याला मनपाचे ढिसाळ आर्थिक नियोजन कारणीभूत आहे. या ठेकेदारांची बिले त्यांना तात्काळ मिळावीत यासाठी सुरू असणार्‍या उपोषणाला भेट देवून शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसचा पाठिंबा दिला आहे.

काँग्रेसचे नेते फारुक शेख यांनी मध्यस्थी करत शहर जिल्हाध्यक्ष काळे यांच्या समवेत ठेकेदारांची चर्चा उपोषणस्थळी घडवून आणली. यावेळी ठेकेदारांनी आपल्या व्यथा काळे यांच्यासमोर मांडल्या. प्रकाश पोटे, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, शिक्षक काँग्रेसचे नेते प्रसाद शिंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. अक्षय कुलट, दीपक धाडगे, विशाल कळमकर आदी यावेळी उपस्थित होते.

शहराच्या विविध भागांमध्ये पाणी, गटारी, रस्त्यांवरील खड्डे अशा अनेक छोट-छोट्या दैनंदिन तातडीच्या कामांसाठी 50,000 रुपयांपर्यंतची कामे मनपाच्या कोटेशनवर छोटे ठेकेदार करत असतात. या ठेकेदारांद्वारे होणार्‍या तातडीच्या छोट्या दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांना दिलासा मिळत असतो.

मात्र मनपाचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करूनदेखील मागील सात-आठ वर्षांची बिले अजूनही मनपाने या ठेकेदारांना अदा केलेली नाहीत. ठेकेदारांनी कर्ज काढून, सोने गहाण ठेवून ही कामे केली आहेत. या ठेकेदारांनी काम करणे बंद केल्यास त्याचा नागरिकांना तातडीच्या सुविधा मिळण्यावर विपरीत परिणाम होऊन फटका बसू शकतो.

उपोषणकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकार्‍यांनी उपायुक्त पठारे यांची भेट घेऊन कर वसुलीतून 50 कोटी रुपयांच्या झालेल्या संकलित रकमेतून ठेकेदारांची बिले तात्काळ करण्यात यावी अशी मागणी केली आहे. उपोषणाचा चौथा दिवस असून उपोषणकर्त्यांची शारीरिक स्थिती ढासळली आहे. असे असतानादेखील मनपाच्या अधिकार्‍यांना त्यांची भेटही घ्यावीशी वाटली नाही, याबद्दल तीव्र नाराजी काळे यांनी व्यक्त केली.

टक्केवारीसाठी धावपळ करणार्‍यांची डोळेझाक

सत्ताधारी पदाधिकारी उपोषणकर्त्यांसमोरून महापालिकेत दररोज ये-जा करतात. त्यांना ठेकेदारांच्या वेदना दिसत नाहीत. काही सत्ताधारी ठेकेदारांची भेट घेतात पण त्यांची बाजू मांडत नाहीत. टक्केवारीसाठी मोठ्या ठेकेदारांच्या बिलांच्या रकमा अदा करण्यासाठी धावपळ करणारे सत्ताधारी पदाधिकारी छोट्या ठेकेदारांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत दृष्टिहीन झाल्याचा आव आणत आहेत, असा आरोप काळे यांनी सत्ताधार्‍यांवर केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या