Friday, April 26, 2024
Homeनाशिकरामकुंडातील काँक्रिट काढण्यात चालढकल

रामकुंडातील काँक्रिट काढण्यात चालढकल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या गोदावरीला अविरल वाहती करण्यासाठी गोदाप्रेमी सातत्याने प्रयत्न करताना दिसून येतात. न्यायालयातून आदेश मिळवले असतानाही पुरोहित संघासह काही लोकांच्या विरोधामुळे त्या कामाला अडथळा येत आहे. प्रशासनाची बोटचेपी भूमिका याला कारणीभूत ठरत आहे, असा आक्षेप गोदाप्रेमींनी घेतलेला आहे.

- Advertisement -

गोदापात्रातील काँक्रिट काढण्यासाठी न्यायालयाचे आदेश मिळालेले आहेत. तसे असताना याबाबत ‘स्मार्ट सिटी’ कंपनी पदाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी स्पष्ट भूमिका घेत नसल्याने रामकुंडासह इतर 12 कुंडांचे काँक्रिटीकरण काढण्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. रामकुंडासह नदीपात्रातील 17 कुंडे आहेत. त्यातील 5 कुंडांतील काँक्रिट काढण्यात आले. या कुडांमध्ये काही ठिकाणी जिवंत पाण्याचे झरे आढळून आले. यासारखेच अनेक झरे रामकुंडाच्या काँक्रिटमध्ये दडपले गेले, असा दावा गोदाप्रेमींनी केला आहे.

न्यायालयाने काँक्रिट काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंंतर यावर निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांच्या त्रिसदस्यीय समितीने याबाबत निर्णय द्यायचा होता. त्यांनी काँक्रिट काढण्याची सूचना दिली. मात्र ‘स्मार्ट सिटी’कडून घेण्यात आलेल्या बैठकीत पुरोहित संघाने विरोध केला होता. त्यांच्या विरोधामुळे रामकुंडातील काँक्रीट काढण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांचे मार्गदर्शन मागण्यात आले होते. त्यांनी या कामाला स्थगिती दिली. सर्वांच्या समन्वयातून हा प्रश्न सोडवण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केली. त्यासोबतच हे प्रकरण ‘निरी’कडे सोपवून त्यांना पाहणी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता ‘निरी’च्या अहवालाकडे गोदाप्रेमींचे लक्ष लागलेले आहे.

प्रकरण जाणार एकवर्ष पुढे

न्यायालयाचे आदेश असताना वादात कालापव्यय करायचा. येत्या काही दिवसांत पावसाच्या पाण्यामुळे नदी प्रवाहीत राहणार आहे. त्यामुळे रामकुंड कोरडे करणे शक्य होणार नाही. यामुळे आपोआपच काँक्रिट काढण्याचे काम जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलले जाईल. त्यावेळी काय भूमिका घ्यायची हे तेव्हा पाहता येईल, अशी काहीशी भूमिका प्रशासनाची आहे काय? प्रत्यक्षात सुरू केला जात असलेला विवादाचा तिढा काँक्रिट काढण्यासाठीचा निर्णय एक वर्ष पुढे ढकलण्यासाठी केला जात नाही ना? असा सवाल गोदाप्रेमींनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या