Thursday, April 25, 2024
Homeनगरकरोना साखळी तोडण्यासाठी आता ‘चेस दि व्हायरस’

करोना साखळी तोडण्यासाठी आता ‘चेस दि व्हायरस’

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोनाची साखळी तोडायची असेल तर ‘चेस दी व्हायरस’ अशा पद्धतीने आता आरोग्य यंत्रणा काम करणार आहे. ज्या ठिकाणी बाधित व्यक्तींची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासणी करून आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करून संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ज्यांना लक्षणे नाहीत, अशा करोना बाधित रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात येण्याएवजी त्यांच्या जवळच्या तालुकास्तरीय किंवा महापालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. करोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी कृतिशील वागण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, अनावश्यकरीत्या घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये तपासणी करून घेण्याचे आवाहन द्विवेदी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच आरोग्य अधिकार्‍यांशी चर्चा केली. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव राज्यभरात सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्या तीन महिन्यांत बाधितांची संख्या आटोक्यात होती. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, महापालिका, जिल्हा परिषद या शासकीय यंत्रणांसह लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था यांनीही त्याकामी महत्त्वाची भूमिका बजावली.

मात्र, लॉकडाऊन शिथिलतेनंतर अन्य जिल्ह्यांतून येणार्‍या नागरिकांचा ओघ वाढला आणि त्यातून संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. हे रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने जलद गतीने बाधितांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासणीसाठी अँटीजेन चाचण्या करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.

त्याचबरोबर खासगी प्रयोगशाळांमधूनही करोना तपासणी करण्यात येत आहे. यामुळे करोना बाधित रुग्णांचे लवकर निदान होत असून त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे शक्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र, खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून येणार्‍या परंतु लक्षणे न जाणवणार्‍या रुग्णांना खासगी रुग्णालये जिल्हा रुग्णालयात पाठवीत आहेत. वास्तविक अशा रुग्णांसाठी प्रत्येक तालुक्यात तसेच महापालिका स्तरावर कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. अशा रुग्णांना त्याठिकाणी उपचारासाठी दाखल होण्याबाबत संबंधित खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांनी सांगणे आवश्यक आहे.

अशा रुग्णांना तेथे अधिक उपचारांची गरज असेल तरच त्यांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, जिल्हा रुग्णालय किंवा खासगी कोविड हॉस्पिटल येथे पाठविणे आवश्यक असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले. शासकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी-कर्मचारी आणि आपत्कालीन परिस्थितीत काम करणार्‍या सर्व यंत्रणांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असा सल्लाही द्विवेदी यांनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्रच करोनाचे रुग्ण वाढत आहेत. गावोगाव वाढणार्‍या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. खासगी प्रयोगशाळांतील चाचण्यांबाबतही शंका उपस्थित केली जात असल्याने नागरिकांचा ओढा शासकीय रुग्णालयाकडे आहे. आरोग्य यंत्रणेचे बळ वाढवितानाच खासगी प्रयोगशाळांबाबत असलेला संभ्रम दूर करण्याचीही आवश्यकता निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या