Friday, April 26, 2024
Homeनाशिकघरांची पडझड; खरीप पिकांची हानी

घरांची पडझड; खरीप पिकांची हानी

मनमाड । प्रतिनिधी Manmad

गत चार-पाच दिवसांपासून शहर परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले.

- Advertisement -

रात्री 8 ते 2 या 6 तासात तब्बल 104 मिमी पाऊस कोसळल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले गेले. घरांची पडझड, उभी खरीप पिके आडवी झाली तर नदीकाठच्या वस्तींमध्ये पाणी शिरल्याने नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाल्याने शेतकरी बांधव अक्षरश: हवालदिल झाले आहे.

मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणार्‍या दोन्ही नद्यांना मोठा पूर आल्याने नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. पालिका प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी वेळीच धाव घेवून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविल्याने अनर्थ टळला.

संततधार पावसाने अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले. खळ्यात, चाळीत पाणी शिरल्यामुळे शेकडो टन कांदा भिजून खराब झाला तर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी इंधन प्रकल्पाची सुरक्षा भिंत कोसळल्याने पानेवाडी-मनमाड रस्ता बंद झाला होता.

या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेतीला बसला असून अनेक शेतात पाणीच-पाणीच झाले तर उभी पिके आडवी झाली असल्याने शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडले आहे.

गत चार-पाच दिवसांपासून रोज सायंकाळी हजेरी लावणार्‍या पावसाचे नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री 8 वाजेच्या मुसळधार आगमन झाले. सुरुवातीला हलक्या सरी पडल्या मात्र त्यानंतर विजांचा कडकडाटासह रात्री 2 वाजे पर्यंत मुसळधार पावसाने अक्षरश शहर परिसराला झोडपून काढले.

6 तासात तब्बल 104 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या अनेक वर्षानंतर काही तासात इतका पाऊस झाल्याचे म्हटले जात आहे .मुसळधार पावसामुळे शहर्तून वाहणार्‍या रामगुळणा,पांझण या दोन्ही नद्यांना मोठे पूर आल्यानंतर गुरुद्वारा मागील दोन तर टकार मोहल्ला भागातील एक असे तिन्ही पूल पाण्याच्या खाली गेले होते.

पुराचे पाणी नदी काठी असलेल्या घरामध्ये शिरल्यामुळे भीती पसरून पळापळ झाली. पालिका प्रशासन, पोलीस, स्थानिक नगरसेवक तरूणांनी पुरात सापडलेल्या नागरिकांना घरातून बाहेर काढले. टकार मोहल्ला भागातील सुमारे 350 पेक्षा जास्त पूरग्रस्तांना जामा मस्जिदच्या हॉलमध्ये तर गवळी वाड्यातील सुमारे 150 नागरिकांना व्यायाम शाळेत हलविण्यात आले होते.

भाबड वस्तीतील प्रभाकर लाड यांच्या घराची भिंत पडून त्यांचे मोठे नुकसान झाले तर इतर काही भागात देखील घरांची पडझड झाली असल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले. पावसाचे पाणी खळ्यात, मळ्यात चाळीत शिरल्यामुळे साठवून ठेवलेला शेकडो टन कांदा भिजून खराब झाला त्यामुळे व्यापारी व शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

मनमाडपासून 7 किमी अंतरावर असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी इंधन प्रकल्पाची सुरक्षा भिंत कोसळली त्यामुळे पानेवाडी-मनमाड रस्ता बंद झाला होता. सदर भिंत धोकादायक झाली असल्याचे पत्र माजी सरपंच अंकुश कातकडेसह ग्रामपंचायतीने देखील कंपनीला दिले होते.

मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कातकडे यांनी केला.परतीच्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले असल्याने उभी पिके आडवी झाली असल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या