Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकस्वच्छ शहर स्पर्धा : दुसर्‍या टप्प्यांतर्गत केंद्रीय पथकाकडून पाहणी

स्वच्छ शहर स्पर्धा : दुसर्‍या टप्प्यांतर्गत केंद्रीय पथकाकडून पाहणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशपातळीवरील स्वच्छ शहर स्पर्धेच्या (Clean City Competition)दुसर्‍या टप्प्यांतर्गत कचरामुक्त शहराच्या तपासणीसाठी केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून या पथकाकडून शहरातील विविध ठिकाणी पाहणी करून तपासणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार ( NMC Commissioner Ramesh Pawar ) यांनी काही दिवसांपूर्वीच घनकचरा व्यवस्थापन, उद्यान, बांधकाम, नगररचना आणि यांत्रिकी विभागाला सतर्कतेचा इशारा दिला होता.

- Advertisement -

स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा समावेश पहिल्या पाच शहरांमध्ये व्हावा, यासाठी आयुक्त रमेश पवार यांनी पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याकरता नागरिकांच्या फिडबॅकवर भर दिल्यानंतर आता कचरामुक्त शहराच्या सर्वेक्षणाकरता येणार्‍या पथकाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पवार यांनी घनकचरा व्यवस्थापन, उद्यान, बांधकाम, नगररचना, यांत्रिकी विभागाच्या अधिकार्‍यांना स्वच्छतेवर भर देण्याचा आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.

केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत दरवर्षी देशपातळीवरील स्वच्छ शहर स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेअंतर्गत केंद्रीय पथकांमार्फत तीन टप्प्यात सर्वेक्षण केले जाते. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय पथकाने नाशकात येत पहिल्या टप्प्याची तपासणी पूर्ण करत नागरिकांचा फिडबॅक जाणून घेतल्यानंतर आता ‘झिरो गार्बेज सिटी’ अर्थात कचरामुक्त शहर गटाच्या सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक नाशकात दाखल झाले असून पथकातील सदस्यांकडून शहरातील विविध ठिकाणची पाहणी करण्यात येत आहे.

शहरात ओला व सुका कचर्‍याच्या वर्गीकरणाची नागरिकांकडून होणारी अंमलबजावणी, व्यावसायिक क्षेत्रात ओला व सुका कचर्‍यासाठी स्वतंत्र डस्टबीन ठेवण्याच्या सूचनांची अंमलबजावणी आणि घंटागाडीमार्फत होणारी प्रत्यक्ष अंमलबजावणी याची या पथकामार्फत प्रत्यक्ष भेटीद्वारे माहिती घेतली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या