Friday, April 26, 2024
Homeराजकीयगावित साहेबांना न्यायालयाने ‘क्लिन चिट’ दिली

गावित साहेबांना न्यायालयाने ‘क्लिन चिट’ दिली

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

गावित साहेबांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याबाबत त्यांना न्यायालयाने क्लिन चिट दिलेली आहे. उलट भाजपाच्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनंतर रघुवंशी यांचे फार्म हाऊस पाडून सौ.रत्ना रघुवंशी यांना नगराध्यक्ष पदावरुन अपात्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

परंतू जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही करु नये म्हणून चंद्रकांत रघुवंशी हे जिल्हाधिकार्‍यांचे ‘स्पोक पर्सन’ बनले आहेत असा आरोप खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत केला.

येथील माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी आज पत्रकार परिषद घेवून खा.डॉ.हीना गावित यांनी त्यांच्यावर रेमडिसिवीर इंजेक्शन वाटपात केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे खंडन केले. उलट गावित म्हणजे भ्रष्टाचाराचे विद्यापीठ आहे, असा आरोप त्यांनी गावितांवर केला.

याबाबत दुपारी ४ वाजता खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषद घेवून प्रत्युत्तर दिले. खा.डॉ.हीना गावित म्हणाले, गावित साहेबांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत न्यायालयाने त्यांना क्लिन चिट दिली आहे.

श्री.रघुवंशी यांचे झराळी येथील फार्म हाऊस हे अनधिकृत असून त्याबाबत भाजपाच्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनंतर ते पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, तरीही आतापर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

हे फार्म हाऊस रघुवंशी यांच्या नावावर असून त्यांच्या पत्नी सौ. रत्ना रघुवंशी या नगराध्यक्षा असल्याने त्यांना अपात्र घोषित करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे चौकशी प्रलंबित आहे. याशिवाय औरंगाबाद खंडपिठात २०० कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन काय कारवाई केली याची माहिती खंडपिठाने मागविली आहे.

मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी या सर्व बाबींकडे लक्ष देवू नये, कोणतीही कारवाई करु नये म्हणून श्री.रघुवंशी हे जिल्हाधिकार्‍यांचे ‘स्पोक पर्सन’ बनले आहेत. त्यांनी पारदर्शक काम केले असते तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती, असेही खा.डॉ.गावित म्हणाल्या.

खा.डॉ.गावित पुढे म्हणाल्या, जिल्हाधिकारी हे दोन महिन्यांपुर्वी आलेले नाहीत. ते दोन वर्षापासून येथे कार्यरत आहेत. मी २०१४ मध्ये देशातील तत्कालीन टॉप टेन खासदार माणिकराव गावित यांना निवडणूकीत हरविले, त्यानंतर २०१९ मध्ये सहा वेळा आमदार राहिलेल्या ऍड.के.सी.पाडवी यांना पराभूत केले.

त्यामुळे एखादा मोठा अधिकारी किंवा नेता निवडणुकीत आपल्यासमोर उभा राहिला तरी मला माझ्या कामावर विश्‍वास आहे, जनतेची कामे आम्ही करतो म्हणून निवडून येतो. त्यामुळे कोणालाही प्रतिस्पर्धी मानत नाही, असेही खा.गावितांनी सांगितले.

खा.गावित पुढे म्हणाल्या, जिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलची काही नियमावली आहे, त्यात मी बसत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जिल्हा रुग्णालयात सेवा देवू शकत नाही.

परंतू माझ्या बहिणीची पदव्युत्तरची एन्ट्रन्स परीक्षा झाल्यानंतर ती सेवा देणार असल्याबाबत मी आधीच जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांशी बोलली आहे. दरम्यान, एमबीबीएससाठी व एमडीसाठीही गुणवत्तेनुसारच निवड झाली होती.

मी कोणतेही डोनेशन न देता पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. उलट कल्याणी रघुवंशी यांनी डोनेशन देवून वैद्यकीय प्रवेश मिळविल्याचा आरोपही त्यांनी केला.

एमबीबीएस करत असतांना डॉ.तात्याराव लहाने हे त्यावेळी नेत्र विभागात कार्यरत होते, ते आता डिन झाले होते. त्यामुळे मी पूर्णपणे गुणवत्तेनुसारच परिक्षा देवून उत्तीर्ण झाली आहे, माझ्या शिक्षणात तात्याराव लहाने यांचा काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मी ज्यावेळी आरोग्य शिबीरे घेत होती, त्यावेळी राजकारणात येण्याचा विचारही केला नव्हता. मात्र, आपण डॉक्टर असल्याने शिवाय राजकारणात आल्यास आरोग्यासोबतच इतर प्रश्‍नांबाबतही आपल्याला काहीतरी समाजासाठी करता येईल, म्हणून राजकारणात प्रवेश केला आणि यशस्वी झाली.

जिल्हा प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे कोरोनाची स्थिती गंभीर झाल्याचा पुनरुच्चार डॉ.गावितांनी केला. सध्या खेडोपाडी कोरोनाचे रुग्ण वाढल्याने प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

जिल्हा रुग्णालयातील रेमडिसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकार्‍यांनी खाजगी रोटरी वेलनेस सेंटरला देवून टाकले.

मात्र, दिलेले इंजेक्शन अद्याप परत घेतलेले नाहीत. मुळात सरकारी औषधी खाजगी ठिकाणी विकत किंवा उसनवारी तत्वावर देता येत नाही मग जिल्हाधिकार्‍यांनी अनधिकृतरित्या रोटरीला इंजेक्शनचा पुरवठा केला आहे.

जिल्हाधिकार्‍यांना जो धनादेश दिला आहे, त्यावर तारीख का टाकली नाही, याबाबतही खुलासा करावा. रोटरीला इंजेक्शन दिल्यानंतर १५, २० संस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे रेमडिसिवीरची मागणी केली. मात्र, जिल्हाधिकार्‍यांना त्यांना नकार दिला. मग रोटरी वेलनेस सेंटरलाच का दिले असा प्रश्‍न त्यांनी पुन्हा उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या