शहर बससेवा आगाराची आयुक्तांकडून पाहणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेने शहर बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे बससेवा सुरु करण्याचे काम थांबले होते. आता बससेवेसंबधी विविध कामांना गती आली असून या उर्वरीत कामे पूर्ण करुन बससेवा सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकार्‍यांसमवेत बस आगारच्या जागेवर जाऊन पाहणी करीत कामास गती देण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले.

नाशिक महानगरपालिकेकडून शहर बससेवा सुरु करणेचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता बहुतांशी प्रक्रिया पूर्ण झाल्या असून शिल्लक कामांना आता गती देण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. बससेवेकरीता बस ऑपरेटरची नेमणूक करणे, वाहक पुरविणे कामी एजन्सी नेमणे, इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम यंत्रणा उभारणे, नवीन बसडेपो उभारणे, टर्मिनल, थांबे उभारणे या व इतर अनुषंगीक कामांकरीता मागील वर्षी कार्यवाही सुरु करण्यात आली होती.

मात्र या सर्व कामांना कोरोना साथ व लागु झालेल्या लॉकडाऊनमुळे बस सेवेसंबंधीत विविध कामे पूर्ण करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर बससेवेसंबधी विविध कामांना गती आली असुन सदर उर्वरीत कामे पूर्ण करुन बससेवा सुरु करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त जाधव यांनी बुधवारी अधिकार्‍यासमवेत प्रस्तावीत तपोवन व सिन्नर फाटा येथील डेपोंची जागेची पाहणी केली.

तसेच एस. टी. महामंडळाचे निमाणी बस स्थानक, नाशिकरोड येथील टर्मिनल, नाशिकरोड येथील एस. टी. महामंडळाचे आनंंदनगर येथील बसडेपो बससेवेच्या आयटीएमएस यंत्रणेचे कंट्रोल कमांड सेंटर आदींची पाहणी केली.

आयुक्तांनी बससेवेसंबंधी विविध कांमांची सद्यस्थिती बाबत माहिती घेऊन शहर बससेवा सुरु करण्याचे दृष्टीने कामे पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. या पहाणी दौर्‍यात त्यांच्यासमवेत शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता, शिवाजी चव्हाणके, एसटीचे विभागीयं नियंत्रक नितीन मैद, मनपाचे कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, गायधनी, बंड व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *