Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याचंद्रकांत पाटील यांचा माफीनामा

चंद्रकांत पाटील यांचा माफीनामा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते, महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता, असा खुलासा करत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी त्यांच्या तोंडून निघालेल्या शब्दाबद्दल माफी मागितली आहे.

- Advertisement -

या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी. ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली ती ही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना पाटील यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात शिक्षण संस्था चालकांकडून होणाऱ्या सरकारी अनुदानाच्या मागणीवर बोलताना महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा दाखला देत ‘भीक’ हा शब्द वापरला होता. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते. पिंपरी- चिंचवडमध्ये शाईफेक करून पाटील यांचा निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना तसेच शाईफेकीच्या घटनेचे मोबाईल कॅमेराने चित्रीकरण करणाऱ्या एका पत्रकाराला अटक करण्यात आली होती.

ही कारवाई करताना पोलिसांनी आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न या गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल केले होते. याशिवाय पाटील या यांनी एका मुलाखतीत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. पिंपरी चिंचवडमधील अनेक वकीलचंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या कार्यकर्त्यांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी पुढे आले होते. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर हे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसताच चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली आहे.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे माझ्या कृतीत अनुकरण करत आलो आहे. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते, असे पाटील यांनी म्हटले आहे.

तरीही माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या