Thursday, April 25, 2024
Homeनगरसेंट्रल बँकेच्या आधार केंद्राकडून आर्थिक लूटमार

सेंट्रल बँकेच्या आधार केंद्राकडून आर्थिक लूटमार

टिळकनगर |वार्ताहर| Tilknagar

श्रीरामपूर येथील सेंट्रल बँकेत असलेल्या आधार केंद्रात नागरिकांची होत असलेली आर्थिक लुटमार बँक प्रशासनाने तात्काळ थांबवावी, अन्यथा जवाबदार संबंधित अधिकार्‍याला काळे फासू, असा इशारा भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिला आहे.

- Advertisement -

शासनाने विविध योजनेसाठी बँकेच्या कामासाठी, शेतीच्या कामासाठी आधारकार्ड अनिवार्य केले आहे. लहान बालकांनाही शाळेसाठी आधार कार्डची गरज आहे, 5 वर्षाखालील मुलांकडे आधारकार्ड असावे आणि ही प्रक्रिया मोफत असताना श्रीरामपूरच्या सेंट्रल बँकेत चालू असलेल्या आधार केंद्रात ग्रामीण व शहरी भागातील अनेक नागरिकांची मोठी आर्थिक लूट होताना दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या येथे सकाळी आठ वाजल्यापासून रांगा लागलेल्या असतात. शासनाने आधारकार्ड मोफत काढून दिले जाईल, असे सांगितले असताना आधारकार्ड काढण्यासाठी पैसे मोजावे लागतात. हे कागदपत्र, ते कागदपत्र नाही म्हणून अडवणूक केली जाते. आठ-आठ दिवस ग्रामीण भागातील नागरिकांना आधार कार्डसाठी चकरा माराव्या लागतात, तरी ते वेळेवर मिळत नाही. बँकेच्या बाहेर बँकेने नेमून दिलेल्या एका खासगी एजंट चालकाकडून मोठी आर्थिक रक्कम उकळली जात असल्याचा आरोप संदीप मगर यांनी केला आहे.

विशेष म्हणजे बँकेकडून लहान मुलांच्या नवीन आधार कार्ड काढण्याची सेवा ही मोफत असल्याच्या बँकेतील एका अधिकार्‍याकडून सांगितले गेले आहे. मात्र याउलट बँकेने ठेवलेला खाजगी चालक अव्वाच्या सव्वा रक्कम नागरिकांकडून वसूल करताना दिसत आहे. असाच एक प्रकार उघडकीस आला.

काल ग्रामीण भागातील एका विवाहित तरुणांकडून या बँक प्रशासनाने ठेवलेल्या खासगी चालकाने नवीन लहान मुलांचे आधार कार्ड काढायला पैसे लागतात व मी खासगी असल्याने पैसे द्यावेच लागेल, असे ठामपणे सांगितले. त्यानंतर या तरुणाने संबंधित चालकाची तक्रार बँकेतील एका अधिकार्‍याकडे केली. या अधिकार्‍यांने तात्काळ खासगी चालकाला बोलावून विचारणा केली. लहान मुलांचे आधार कार्डची मोफत सेवा असून तू नागरिकांकडून पैसे का वसूल करीत आहे, तुला तर बँक याचा मोबदला अदा करते, असे खडेबोल सुनावत कोणत्याही प्रकारची रक्कम वसूल न करण्याच्या कडक सूचना दिल्या.

बँक प्रशासनाने नागरिकांची होत असलेली आर्थिक लूट तात्काळ थांबवून मोफत सेवेचा फलक बँक कक्षेत लावावा तसेच खासगी चालकांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मगर यांच्यासह भीमशक्तीचे संपर्कप्रमुख अमोल काळे, जिल्हा संघटक सुनील संसारे, किरन गांगुर्डे, केशरबाई पवार, दिलीप पवार, गुलाब शेख, चंद्रकांत बोरुडे, सलीम शेख, मदीन शेख, निलेश हलगे, सिंधू देशमुख, बाबूलाल मोरे, सुमन मोरे, यशोदा मोरे आदींनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या