Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना उभारी

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना उभारी

नैताळे। वार्ताहर Niphad / Naitale

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना शासकीय नियमानुसार आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपत असली तरी सामाजिक जबाबदारी पुर्ण होत नाही.

- Advertisement -

याच सामाजिक जबाबदारी व उत्तरदायित्वाच्या भावनेतून महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी हा कार्यक्रम राज्यासह निफाड तालुक्यात राबविला जात आहे. या कार्यक्रमा अंतर्गत श्रीरामनगर येथील बाबाजी हंडोरे या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या घरी शासनाच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबाच्या अडचणी समजावून घेऊन त्या तत्काळ सोडवून उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला उभारी देण्यासाठी 2 ते 9 आक्टोबर कालावधीत शासनाच्या विविध विभागातील अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची सध्याची परिस्थिती समजावून घेऊन त्या कुटुंबाला महाराष्ट्र शासनाच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ देता येईल हे निश्चित करुन त्यानुसार त्यांना लाभ देण्यासाठी उभारी हा कालबद्ध कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

यासाठी निफाडच्या प्रातांधिकारी डॉ.अर्चना पठारे, सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे, गटविकास अधिकारी संदिप कराड, तालुका कृषी अधिकारी पाटील, नायब तहसीलदार या अधिकार्‍यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

निफाडचे सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे यांच्यासह सहकार अधिकारी राजेश ढवळे, कैलास सोनवणे, निफाड देखरेख संघाचे मुख्य सचिव विठ्ठल कोटकर, श्रीरामनगरचे कामगार तलाठी शंकर खडांगळे, ग्रामसेवक राजेंद्र बोरगुडे, सचिव शिवाजी तुगावे या अधिकारी वर्गाने श्रीरामनगरचे बाबाजी हंडोरे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट देऊन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती समजावून घेऊन शासनाच्या प्रलंबित काही अडचणी असेल तर त्या समजावून घेतल्या.

तसेच कुटुंबाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या उभारी कार्यक्रमाअंतर्गत बँकाकडून नव्याने अर्थसहाय्य देण्यासाठीचे सुतोवाच करण्यात आले. यावेळी श्रीरामनगरचे मा. सरपंच भीमराज काळे, सोसायटी चेअरमन कैलास काळे, मा. चेअरमन अशोक कोंढरे, ग्रा.पं. सदस्य रविंद्र शिंदे, नागेश हंडोरे, नामदेव शिंदे, दौलत शिंदे, अतुल शिंदे उपस्थित होते.

तालुक्यात 31 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

निफाड तालुक्यात 1 जानेवारी 2015 पासून 31 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबापर्यंत तालुक्यातील महसूल, सहकार, ग्रामविकास व कृषी विभागातील तालुकास्तरीय अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन अडचणी समजावून घेऊन शासनाच्या वतीने विविध योजनांचा त्या कुटुंबाला फायदा करुन नव्याने उभारी देण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू आहे.

अभिजित देशपांडे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड

- Advertisment -

ताज्या बातम्या