Saturday, April 27, 2024
Homeनगरगाडीचे ऑईल गळत असल्याचे सांगत एक लाखाची रोकड लांबवली

गाडीचे ऑईल गळत असल्याचे सांगत एक लाखाची रोकड लांबवली

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

‘साहब तुम्हारे गाडीके इंजन से ऑईल टपक रहा है, असे म्हणत गाडीमध्ये असलेली एक लाख रुपयांची रोकड दोन चोरट्यांनी पळवण्याची घटना कर्जत बस स्थानकावर सोमवारी(दि. 22) भर दिवसा सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याप्रकरणी देवराव बाबुराव भैलुमे (रा. भैलुमे वस्ती, कुळधरण रोड, कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता ते कर्जत बस स्थानकाच्या जवळ असणार्‍या भारतीय स्टेट बँकेमध्ये गेले होते. त्यांनी एक लाख रुपयांची रोकड बँकेमधून काढली. कर्जत बस स्थानकामध्ये त्यांनी त्यांची स्वतःची कार लावली होती. गाडी सुरू करून बस स्थानकाच्या दारामध्ये आलेले असताना अनोळखी व्यक्ती गाडी समोर आली व तुमच्या गाडीतून ऑईल गळत असून इंजीनमधून धूर निघत असल्याचे म्हणाली.

भैलुमे यांनी त्यांची कार थांबवली, तेव्हा त्या चोरट्याने गाडी बस स्थानकावरील मोकळ्या जागेमध्ये गाडी लावा असे सांगत दिशा दर्शन केले. मोकळ्या जागी गाडी थांबून भैलूमे गाडीच्या खाली उतरले त्या चोरट्याने त्यांना बोनेट उघडण्यासाठी देखील मदत केली आणि कुठून धूर येत आहे हे पाहत असताना दुसर्‍या चोरट्याने संधी साधून गाडीच्या ड्रायव्हर सीटवर असलेले एक लाख रुपयांची बॅग उचलली. कोणाला काही समजण्यापूर्वीच त्या दोघांनी दुचाकीवरून त्या ठिकाणावरून धूम ठोकली.

दरम्यान हा प्रकार देवराव भैलुमे यांच्या लक्षात आला तोपर्यंत उशिर झाला होता. माहिती मिळताच घटनास्थळी दोन पोलीस उपनिरीक्षक व काही पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेत बस स्थानक परिसरामध्ये पाहणी केली. तसेच बँक व बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज याची तपासणी केली. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक प्रवीण अंधारे अधिक तपास करत आहेत.

दहा रुपयांची पुडी, पळवले एक लाख

दोन आज्ञात चोरट्यांनी या चोरीसाठी अवघ्या दहा रुपयांच्या ऑईलच्या पुडीचा वापर केला. देवराव भैलुमे यांना ऑईल गळत आहे असे म्हणत असताना त्यांनी त्याच्या हातातली ऑईलची पुडी गाडीच्या बोनेटवर सांडली आणि त्याच आधारे एक लाख रुपयांची बॅग पळवण्यात चोरटे यशस्वी झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या