Friday, April 26, 2024
Homeनाशिकबसस्थानक की कचरा डेपो?

बसस्थानक की कचरा डेपो?

सिन्नर । वार्ताहर sinnar

येथील सिन्नर बसस्थानकात गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी उघड्यावर कचरा पडलेला दिसत असून परिसराच्या स्वच्छतेकडे आगार व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. राज्यात आपल्या वेगळ्या रूपामुळे नावाजलेल्या या बसस्थानकाला सध्या उतरती कळा लागली असून ठिकठिकाणी पडलेल्या कचर्‍याकडे बघून प्रवाशांसह नागरिक हा बस डेपो आहे की कचरा डेपो, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

- Advertisement -

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून आठ-नऊ वर्षांपूर्वी राज्यात कुठेच नव्हते असे बसस्थानक सिन्नरला उभे राहिले. एखाद्या विमानतळासारखा आभास व्हावा असे हे स्थानक सर्वांच्याच डोळ्यात भरत होते. स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने असलेले छोटेसे गार्डन, विविध झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच स्थानकात लावण्यात आलेले भव्य एलईडी टीव्ही, प्रवाशांना बसण्यासाठी स्टीलचे बाकडे अशा सर्व सुविधांमुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण होते. सुरुवातीला काही वर्षे आगाराकडून या ठिकाणी नियमित स्वच्छता ठेवण्यात येत होती. त्यामुळे गुटखा, तंबाखू खाऊन कुठेही थुंकणार्‍यांनाही येथे घाण करण्यास लाज वाटत असे.

मात्र काही वर्षांतच बसस्थानकाला घरघर लागली अन् स्थानक आवारात ठिकठिकाणी कचरा, तंबाखू, गुटख्याची रिकामी पाकिटे, प्लॉस्टिकच्या पिशव्या कुठेही पडलेल्या दिसून येऊ लागल्या. त्यानंतर आता कुठेही थुंकणार्‍यांनी याचा फायदा घेत बस स्थानकातील ठिकठिकाणचे कोपरे थुंकून लाल केल्याचे दिसून येत आहे, तर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असून याकडे आगार व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. दररोज स्थानकात स्वच्छता होते का? का ती नावापुरतीच होते? असा सवाल आता प्रवासी करत आहेत. प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेवर तर कचर्‍याचे ढीगच साचले असून त्याची विल्लेवाट लावण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

दिवसेंदिवस यात मोठी वाढ झाली असून सर्वच परिसरात आता केवळ कचराच कचरा दिसून येत आहे. प्रवेशद्वारासमोरील गार्डनची दुरवस्था होऊन ते केवळ कचरा गार्डन झाले आहे. अनेक दिवस हा कचरा एकाच जागी पडून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. कचर्‍यातील प्लॉस्टिकच्या पिशव्या हवेने सर्वत्र उडत आहेत. आगार व्यवस्थापनाने बसस्थानकाला आलेली अवकळा दूर करावी व बसस्थानक परिसरात नियमित स्वच्छता करण्याबरोबरच साचलेल्या कचर्‍याची विल्हेवाट वेळच्या वेळी लावावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

गार्डन झालेमैदान

बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या मोकळ्या जागेवर छोटेसे गार्डन बनवण्यात आले होते. या जागेत मध्यभागी लॉन तर त्याच्या चहूबाजूने विविध प्रकारची शोभेची झाडे लावण्यात आली होती. मात्र, काही वर्षांनंतर या गार्डनचीही दुरवस्था झाली असून लॉनवरील गवत आता पूर्णपणे नाहीसे झाले आहे. तसेच पाणी व देखभालीअभावी शोभेची झाडेही सुकून गेली असल्याने गार्डनचे आता केवळ मोकळे ग्राऊंड झाल्याचे दिसत आहे.

पाण्याची टाकी अस्वच्छ

या बसस्थानकात लांब पल्ल्यासह जवळच्या पल्ल्याच्या सर्वच बसेस थांबतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची येथे नीट व्यवस्था नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी बस प्लॅटफॉर्मच्या समोरील बाजूला एक पाण्याची टाकी ठेवण्यात आली असून त्यात कधी-कधी पाणीही राहत नसल्याचे प्रवासी सांगत आहेत. तसेच या टाकीचीही वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने प्रवासी हे पाणी पिण्यास धजावत नाहीत. या टाकीच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या व ग्लास पडलेले दिसून येत असून त्या टाकीतील पाण्याचा वापर केवळ मद्यपीच करत असल्याचे यातून दिसून येते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या