भाजपाच्या मेगा भरतीमुळेच तिघाडीचे सरकार – खडसे

भाजपाच्या मेगा भरतीमुळेच तिघाडीचे सरकार – खडसे

भारतीय जनता पक्षाने निवडणूक काळात केलेल्या मेगा भरतीचा पक्षाला मोठा फटका बसला असून त्यामुळेच राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. भाजपाच्या मेगा भरतीचे मुळ बीज म्हणजे आत्ता सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार असल्याचे खडसे यांनी सांगितले.

या मेगा भरतीमुळे माझ्यासह अनेक निष्टावंतांची तिकीटे कापली, त्यांना बाजूला सारण्यात आले आणी पक्षाला मोठा फटका बसला असल्याची टीका भाजपा नेते माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

त्यांच्या मुक्ताई बंगल्यावर आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी आपल्याच पक्षाच्या मेगा भरतीवर टीका केली.

पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की, निवडणूकीपुर्वीच सर्वप्रथम मेगाभरतीला मी विरोध केला होता व जाहीर कार्यक्रमात टिका केली होती. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांनाच पक्षाने प्रवेश देवून मानाची पदे आणि उमेदवारी दिल्याने निष्टावंतांवर अन्याय झाला आहे.

‘पार्टी विथ डिफरंट’ हा भाजपचा नारा या मेगा भरतीने फोल ठरला असून त्यामुळे भाजपाचे चित्र, संस्कृती आणि संस्कार बदलले आहे. ज्यांना पक्षाने प्रवेश दिला त्यांचा ‘वाल्याचा वाल्मीकी होईल’ हा कयास फोल ठरला आहे.

मेगा भरतीमुळे ‘शंभर टक्के आपलेच सरकार सत्तेवर येईल, अबकी बार २२० पार’ अशी घोषणा होती. त्यामुळे पक्षातील निष्टावंतांना व जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला सारून मेगा भरतीने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यता आली. ज्यांना संधी दिली त्यांना जनतेने हरविले, त्यामुळे राज्यात सत्तेवर आलेल्या नव्या सरकारचे मुळ बीज भाजपाच्या मेगा भरतीत असल्याचे खडसे म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अगोदर आपण या मेगा भरतीवर टिका केल्याची आठवण खडसे यांनी करून दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com