Friday, April 26, 2024
Homeनगररक्त तपासणीतील तफावत पाहताच रुग्णाला धक्का !

रक्त तपासणीतील तफावत पाहताच रुग्णाला धक्का !

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

डेंगूच्या तापाचे निदान झालेल्या पुणतांबा येथील एका रुग्णाने रक्त तपासणीतील एकाच दिवशी केलेल्या दोन अहवालात आलेली तफावत पाहताच गोंधळलेली मनस्थिती होऊन लगेचच काही तासातच रुग्णालयातून डिचार्ज घेऊन घरचा रस्ता धरला. मात्र वैद्यकीय क्षेत्रात असे कसे घडते याबाबत आश्चर्य व्यक्त केले.

- Advertisement -

येथील जळगाव रोडलगत वस्ती असलेल्या एका शेतकर्‍याने त्याच्या मुलाला ताप आल्यामुळे श्रीरामपूर येथील एका डॉक्टरकडे नेऊन तपासणी करून औषधोपचार घेतले. डॉक्टरकडे तपासणी करताना नेहमीप्रमाणे रक्त व लघवीच्या तपासणी करण्यात आल्या. त्याचा अहवाल आल्यानंतर औषधे देण्यात आली. मात्र संबंधित औषधाने रुग्णाला बरे वाटत नसल्यामुळे दुसर्‍या दिवशी श्रीरामपूर येथील एका नामांकित दवाखान्यात अ‍ॅडमिट करण्यात आले. तेथे उपचार सुरु झाल्यानंतर रुग्णास बरे वाटू लागले. परत चौथ्या दिवशी रुग्णाची रक्त तपासणी दवाखान्याच्या रक्त व लघवी तपासणी केंद्रात करण्यात आली. यात रक्तामधील हिमोग्लोबीनचे प्रमाण, पांढर्‍या पेशी तसेच फ्लेटलेटच्या प्रमाणाची स्थिती जाणून घ्यावयाची होती.

दवाखान्यात रक्त दिल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात संबंधित रुग्णाने एका खाजगी रक्त व लघवी तपासणी केंद्राच्या चालकाकडे रक्त देऊन रक्तातील याच घटकाची चाचणी करून घेतली. विशेष म्हणजे दोन तासाने दोन्ही अहवालात फारसे साम्य नसताना मोठी तफावत दिसून आली. एका अहवालात रक्ताचे हिम्लोग्लोबीन 11 होते तर दुसर्‍या अहवालात 14.5 होते. पांढर्‍या पेशीचे प्रमाण एकात 4000 तर दुसर्‍यात 8700 होते. विशेष म्हणजे एका अहवालात फ्लेटलेट ची संख्या 90,000 होते तर दुसर्‍या अहवालात 1,20,000 होते. एकाच व्यक्तीच्या रक्ताच्या दोन अहवालात एवढी तफावत दिसून आल्यावर रुग्णाची मानसिक स्थिती गोंधळाची झाली.

कुटूंबाशी चर्चा करून त्यांनी तातडीने डिस्चार्ज करून घेतला. मात्र रुग्णाच्या वडिलांनी हे अहवाल पुणतांब्यातील काही डॉक्टराना दाखवले असता त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. एका अहवालात हिमोग्लोबीन 11 तर दुसर्‍या अहवालात 14.5 यावर तर त्यांचा विश्वासच बसला नाही. हिग्लोग्लोबीन वाढण्यासाठी महिनाभर उपचार घ्यावे लागतात. त्यानंतर फरक जाणवतो, असे स्पष्ट केले. तेही पेशाने डॉक्टर असल्याने त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र श्रीरामपूरमध्ये डॉक्टरांच्या दवाखान्यातच मेडिकल स्टोअर्स असणे सर्व प्रकारच्या तपासणी तातडीने करून घेण्यामागे काय भूमिका असते याचे स्पष्टीकरण दिले. अनेक डॉक्टर तपासणी फी 300 रुपये असताना किमान 2000 रुपयाची औषधे का देतात याचेही विवेचन केले. करोना काळात तर अनेकानी रुग्णाची मनोभावे सेवा केली तर काहींनी हात धुवून घेतले.

याची तालुकाभर नव्हे तर जिल्ह्यात झालेली चर्चाही ऐकविली. काही तज्ञ डॉक्टर गोड बोलून तसेच पाठीवर हात टाकून कसे उपचार करतात याचे दाखले दिले. वैद्यकिय क्षेत्रात असे प्रकार नवीन नाहीत. याचा आर्वजून उल्लेख केला. हे ऐकून घेतल्यावर संबंधित रुग्णाने डोक्याला हात लावला. मात्र या अहवालाबाबत संबंधित रक्त व लघवी तपासणी केंद्रचालक व डॉक्टरला विचारणा न करता शांत राहणे पसंद केले. कारण कोणीही आपली चूक सहजासहजी कबूल करत नाही व किराणा दुकानापेक्षा आता सर्वसामान्य व्यक्तीचा दवाखाना व डॉक्टरची नित्याचा संबध बदलत्या जीवनशैलीमुळे आला आहे. मात्र जखम शेंडीला व मलम मांडीला असे होऊ नये म्हणून रूग्णांनी सुद्धा सतर्कता बाळगली पाहिजे. तसेच भावनेच्या भरात झटपट निर्णय न घेता सेंकड ओपिनियन घ्यावे, असा एक अनुभव मिळाल्याचे संबधित रुग्ण व त्यांच्या कुटूंबियाने स्पष्ट केले. मात्र या अहवालात एवढी तफावत येऊ शकते का? याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धारही व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या