Friday, April 26, 2024
Homeशब्दगंधआठवणींची गोधडी

आठवणींची गोधडी

थंडीवर लिही म्हटल्याबरोबर मला आठवली ती गोधडी. गोधडी घेतल्याशिवाय थंडी काही जाणार नाही मग ती विचारांची असो, मनाची असो वा पेनाची. तीच गोधडी. त्यात असते आईचे फाटके लुगडे, बाबांचे फाटके धोतर आणि विशेष म्हणजे शर्टाच्या कोपरीच्या बाह्यासुद्धा असतात त्यात. तिच्या रूपाने बाबांचे हात आशीर्वादासाठी सतत पुढे असल्याचाच भास होतो. गोधडी या शब्दातच प्रेम, वात्सल्य, माया, मातृत्व जिव्हाळा दडलेला आहे.

प्रा. माधवी महेश पोफळे

गोधडी आणि आई, गोधडी आणि आजी, गोधडी आणि आजोबा हे समीकरणच अतूट आहे. आपल्या आठवणींमध्ये गोधडीची आठवण नाही असे नाहीच. गोधडी म्हणजे वात्सल्य, गोधडी म्हणजे प्रेम, गोधडी म्हणजे आजीचा स्पर्श, गोधडी म्हणजे आजोबांचा आशीर्वाद, गोधडी म्हणजे आईने गायलेली अंगाई, गोधडी म्हणजे मायेची हळूवार फुंकर, गोधडी म्हणजे मायेचा संवाद, गोधडी म्हणजे वडिलांचा आशीर्वाद, गोधडी म्हणजे वडिलांचेे कष्ट, गोधडी म्हणजे जुन्या कपड्यांचे स्नेहमिलन, गोधडी म्हणजे सप्तरंगाचे अस्तित्व, गोधडी म्हणजे भावंडांमधली मस्ती, गोधडी म्हणजे गालावरचे हसू, गोधडी म्हणजे डोळ्यातील रडू मुसूमुसू, गोधडी म्हणजे ढाल, गोधडी म्हणजे शब्दांचे भांडार, गोधडी म्हणजे सुखाचे अंगण, गोधडी म्हणजे समाधानाचे वृंदावन, गोधडी म्हणजे आठवणीतली साठवण आणि गोधडी म्हणजे आईने दिलेले लग्नातील आंदण.

- Advertisement -

गोधडीची आठवण येते ती हिवाळ्यातच. पूर्वी थंडी पडली की दात कुडकुड वाजायचे. पायांवर चौकटा पडून त्यातून रक्ताचे थेंब बाहेर यायचे. तेव्हा पांघरली जायची गोधडी आणि संरक्षण व्हायचे आपले. कितीही येऊ देत दुलई, रजई, रग बाजारात पण आजही ऊब देते ती गोधडीच. थंडीचे दिवस सुरू झाले की भाद्रपदात ऊन दाखवून गाठोड्यात बांधलेली गोधडी निघायची बाहेर. बरे एक नाही दोन नाही तर माणसी एक गोधडी घराघरांत असायचीच.

आजीच्या नऊवारी साडीची, आजोबांच्या पांढर्‍या शुभ्र धोतराची. तो स्पर्श, तो सुगंध वेगळाच असायचा. थंडीत अंगावर पांघरली की आई, आजी आपल्याला कुशीत घेऊन झोपवते असे वाटायचे. कौटुंबिक कष्टाचे, जिव्हाळ्याचे प्रतीक होती, माय ममतेला ऊब देण्याची तिच्यात ताकद होती, प्रेमाला अजून प्रेम देणारी माया होती.

आज नात्या-नात्यांमधील धागे कमकुवत होताना दिसतात आणि अंगणात एक एक रंगीबेरंगी चिंधी जोडून धाग्याने घट्ट गोधडी विणतानाही कुणी दिसत नाही. आई आणि घरातील इतर बायकांना फावला वेळ कसा घालवावा, हा प्रश्न कधी पडलाच नाही. दुपारच्या वेळी घरातले सगळे काम उरकून अंगणात मांडली जायची गोधडी शिवण्यासाठी रंगीबेरंगी वस्त्रे आणि विणल्या जायच्या एकसारख्या टाक्यांनी गोधड्या. त्या एक-एक टाक्याकडे पाहिले की त्यावरील टाके भुलवतात मनाला आजही. किती सुंदर वीण विणली जायची नात्याची. सून, मुलगी कुणीही बाळंतीण झाले की तिला आणि तिच्या बाळाला चौघडी करून पक्क गुंडाळून झोपवले जायचे. अगदी तेव्हापासून मायेची ऊब मिळायची.

आजीच्या प्रेमाची ऊब दाटायची त्यात. थंडी मावायची त्या गोधडीत. आज घेतली असेल जागा रग, रजई किंवा ब्लँकेटने, पण त्या महागड्या दिखाऊ रजईला सर येणार नाही गोधडीची. पण खात्री आहे ती ऊब, ती माया पुन्हा मिळेल त्या गोधडीतून. पुन्हा दिसेल नात्यांच्या धाग्याची वीण आणि होईल स्पर्श तिचा. पुन्हा दरवळेल तोच गंध जोडले जातील त्या धाग्यात मायेचे बंध. विणला जाईल गोधडीच्या रूपाने नात्यांमधील आठवणींचा गोफ. होईल पुन्हा जाणीव आई-वडील, आजी-आजोबांच्या कष्टमय जीवनाची आणि पांघरली जाईल पुन्हा गोधडी त्याच स्पर्शाने.

- Advertisment -

ताज्या बातम्या