Thursday, April 25, 2024
Homeनगरभाजप नगरसेवकांचे प्रशासनाच्या मनमानी कारभारावर आंदोलन

भाजप नगरसेवकांचे प्रशासनाच्या मनमानी कारभारावर आंदोलन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ भाजपाच्या चार नगरसेवकांचे पालिकेच्या दरवाजात टाळ वाजवून प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

पालिका कार्यालयातील 40 ते 45 अधिकारी कर्मचारी काम सोडून चक्क लग्नाला गेल्याने कामानिमित्त पालिकेत आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परत जावे लागले. अनेकांनी या प्रकाराची तक्रार भाजपाच्या नगरसेवकांना सांगितली. त्यांनी पालिकेत येऊन पाहणी केली असता अवघा एकच कर्मचारी पालिकेत बसून होता. सर्व कार्यालय व केबीन रिकाम्या होत्या. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवक साहेबराव निधाने, निवृत्ती गाडेकर, निलमताई सोळंकी, सचिन गाडेकर या नगरसेवकांसह बाळासाहेब गिधाड, अभिजित काळे, राजेंद्र अग्रवाल, दीपक सोळंकी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील जाधव, अ‍ॅड शंतनु सदाफळ, राष्ट्रवादीचे समिर बेग, लक्ष्मण पडवळकर यांनी पालिकेत कामानिमित्त आलेल्या नागरिकांसह पालिकेच्या दरवाजात टाळ वाजवून पालिका प्रशासनाचा निषेध केला.

यावेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक यांनी पालिका प्रशासनाचे यावेळी वाभाडे काढले. पालिकेत मनमानी व बेजबाबदार कारभार सुरू असून पालिकेला गेल्या तीन वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने पालिका प्रशासन मनमानी पध्दतीने वागत आहे. जे प्रभारी मुख्याधिकारी आहेत ते देवळाली प्रवरा येथे बसून तेथून राहाता पालिकेचा कारभार पहात असून शनिवार व रविवार दोन दिवस सुटी होती.

सोमवार हा कामकाजाचा महत्त्वाचा दिवस असताना पालिकेचे सर्व कर्मचारी व अधिकारी कुणाला काही न सांगता लग्नाला निघून जातात. ही मनमानी असून मुख्याधिकारी यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली.

पालिकेवर कुणाचाच वचक नाही

राहाता पालिकेवर कुणाचा अंकुश राहिला नसल्याचे हे उदाहरण दिसून येत आहे. नागरिकांच्या कामाची टाळाटाळ करणे पदाधिकारी यांनी सांगितलेली कामे न करणे, अशी या सर्वांची मनमानी सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पालिकेला तातडीने कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी नगरसेविका निलमताई सोळंकी यांनी केली. कामानिमित्त आलेल्या नागरिकांनीही मनमानी कारभाराचा निषेध केला. नगरसेवकांच्यावतीने यावेळी निवेदन दिले.

कर्मचार्‍याच्या मुलाचे लग्न होते म्हणून गेलो

याबाबत पालिका कार्यालयीन अधीक्षक जगताप म्हणाले, पालिकेतील कर्मचार्‍याच्या मुलाचे लग्न होते म्हणून काही लोक लग्नाला गेले असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या