Thursday, April 25, 2024
Homeनगरभाजप जिल्हाध्यक्षपदाचा वाद श्रेष्ठींच्या कोर्टात

भाजप जिल्हाध्यक्षपदाचा वाद श्रेष्ठींच्या कोर्टात

अहमदनगर (प्रतिनिधी) – बैठका, व्यूहरचना आदी सर्व सोपस्कार झाल्यानंतरही भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा चेंडू अखेर श्रेष्ठींच्या कोर्टात ढकलण्यात आला. स्थानिक पातळीवर एकमत न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक निरीक्षक विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केले. दोन दिवसांत जिल्ह्यातील तिनही जिल्हाध्यक्षांच्या निवडी प्रदेश कार्यालयातून जाहीर होण्याची शक्यता आहे. 

नगर दक्षिण, नगर उत्तर आणि नगर शहर (महानगर) असे तीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपची आज बैठक होती. दुपारी साडेबाराला ही बैठक सुरू झाली असली, तरी त्यापूर्वी गोपनीय बैठका सुरूच होत्या. बैठकस्थळी निवडणूक निरीक्षक बागडे आणि मावळते जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड आल्यानंतर काही वेळाने ज्येष्ठ नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते आले. त्यानंतर अवघ्या काही वेळातच माजी मंत्री राम शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले, माजी आ. स्नेहलता कोल्हे, माजी आ. वैभव पिचड, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे आणि त्यानंतर माजी खा. दिलीप गांधी आले.
कालपासून माजी आ. कर्डिले (नगर दक्षिण) आणि माजी आ. मुरकुटे (उत्तर जिल्हा) जिल्हाध्यक्षपदासाठी स्पर्धेत असल्याची जोरदार चर्चा होती. प्रत्यक्ष बैठक सुरू झाल्यानंतर मात्र कर्डिले यांनी या पदासाठी इच्छा व्यक्त केली नाही. माजी आ. मुरकुटे मात्र स्पर्धेत उतरले आहेत. प्रा. बेरड यांनी गेल्या चार वर्षात केलेल्या कामाचा आढावा प्रास्ताविकात घेतला. त्यानंतर निवडणुकीचे कामकाज सुरू झाले. विभाग संघटन मंत्री किशोर काळकर यांनी निवडीची प्रक्रिया सांगितली. त्यामध्ये इच्छुकांनी आपले नाव आणि गाव सांगण्यास सांगितले.

- Advertisement -

त्यानुसार नगर दक्षिणमध्ये प्रा. भानुदास बेरड यांच्यासह प्रा. अशोक चोरमले, सुनील पाखरे, राहुल कारखिले (पाथर्डी), साहेबराव म्हसे, सुभाष गायकवाड (राहुरी), संतोष लगड (श्रीगोंदे), अ‍ॅॅड. युवराज पोटे, दिलीप भालसिंग, रवींद्र कडूस (नगर), शांतीलाल कोपनर (कर्जत), विश्‍वनाथ कोरड़े (पारनेर) यांनी इच्छा व्यक्त केली.
तसेच उत्तर जिल्ह्यातून जालिंदर वाकचौरे, शिवाजी धुमाळ, नितीन जोशी (अकोले), भरत फटांगरे, डॉ. भानुदास डेरे, हरिभाऊ चकोर, राजेश चौधरी (संगमनेर), राजेंद्र गोंदकर, नितीन कापसे, शिवाजी बोरकर (शिर्डी), प्रकाश चित्ते (श्रीरामपूर) आणि माजी आ. बाळासाहेब मुरकुटे (नेवासे) यांनी इच्छुक असल्याचे सांगितले. नगर शहर जिल्हाध्यक्षपदासाठी सुवेंद्र गांधी, सचिन पारखी, महेंद्र गंधे, मनेष साठे, दामोधर बठेजा, जगन्नाथ निंबाळकर, बंटी ढापसे, विनोद भिंगारे यांनी आपली इच्छा व्यक्त केली.

एकापेक्षा अनेक इच्छुक असल्याने बागडे यांनी स्वतःहोऊन माघार घेण्याचे आवाहन केले. यात नगर दक्षिणमध्ये काहींनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला, मात्र तो अगदीच अल्प असल्याने प्रत्येकाशी स्वतंत्र चर्चा करूनच निर्णय घेऊ, असे सांगत त्यांनी बंद खोलीत प्रत्येकाला पाचारण केले. यामध्ये नगर दक्षिण, नगर उत्तर आणि महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. अखेरपर्यंत एकमत न झाल्याने निवडीचा चेंडू श्रेष्ठींकडे ढकलण्यात आला.
या बैठकीसाठी कोपरगावचे ज्येष्ठनेेते रवीकाका बोरावके, देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम, अशोक कारखान्याचे संचालक बबन मुठे, नितीन दिनकर, सचिन देसर्डा, सचिन तांबे, नंदकुमार जेजूरकर, धनजंय संत, अनिल भनगडे, मारूती बिंगले, गणेश साठे, किरण लुणिया, सुनील वाणी, रामभाऊ तरस, प्रफुल्ल डावरे आदींसह जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.

मुरकुटे यांच्या नावामुळे निष्ठावंत अस्वस्थ
दक्षिणेत कर्डिले जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाहेर राहिले असले तरी उत्तरेत मात्र माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी आपला दावा कायम ठेवला ़आहे. मुरकुटे यांनी निवडणुकीत उडी घेतल्याने निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. किमान संघटनेत तरी निष्ठावंतांना स्थान द्यावे, असा सूर होता. मुरकुटे यांच्या निवडणुकीतील सहभागामुळे जालिंदर वाकचौर, प्रकाश चित्ते यांच्यासमोर आव्हान उभे राहिल्याचे बोलले जात होते.

नगर शहरात रस्सीखेच
नगर शहर जिल्हाध्यक्षपदासाठी माजी खा. दिलीप गांधी आणि गांधी विरोधी गट आमनेसामने आहे. गांधी विरोधी गटाने सचिन पारखी, महेंद्र गंधे यांची नावे लावून धरली आहेत. तर स्वतः दिलीप गांधी यांनी जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेतून माघार घेत चिरंजीव माजी नगरसेवक सुवेंद्र यांना पुढे केले आहे. एकाच घरात किती दिवस पदे देणार, असा प्रश्‍नही या निमित्ताने गांधी विरोधकांनी उपस्थित केला आहे.

कर्डिले यांचा नकार
बैठकस्थळी येताच कर्डिले यांचे अभिनंदन करण्यासाठी काहीजण सरसावले. मात्र त्याचवेळी त्यांनी आपण इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. भाजपमध्ये सध्या विखे विरूद्ध पराभूत माजी आमदार असे वातावरण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कर्डिले यांना अध्यक्ष करण्याच्या हालचाली असल्याची चर्चा होती. मात्र माजी मंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयात सकाळी झालेल्या बैठकीत आणि त्यानंतर श्रेष्ठींशी झालेल्या चर्चेनंतर कर्डिले निवडणुकीबाहेर राहिल्याचे बोलले जाते. 

- Advertisment -

ताज्या बातम्या