अभीष्टचिंतन | झुंजार नेतृत्व : विजय साने

jalgaon-digital
2 Min Read

राजकारण, समाजकारण आणि बँकिंग आदी क्षेत्रांत कार्याचा ठसा उमटवणारे विजय साने आज (दि.23) वयाची एकसष्ठी पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त.

उत्तम नेतृत्व, व्यासंग तसेच समाजकारण, राजकारणासोबतच अर्थविश्वातही चमकदार कामगिरी बजावून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे विजय साने आज 62 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. साने यांचे शिक्षण चांदवड आणि पिंपळगाव येथे झाले. पुढे 1978 साली व्यवसायानिमित्त त्यांनी नाशिक गाठले. 1980 साली क्रॉम्प्टन ग्रीव्हजमध्ये ते नोकरीस लागले. तेथूनच त्यांच्या त्यांच्या उत्कर्षाला खरी सुरुवात झाली.

नोकरी सांभाळताना कामगार नेते म्हणून त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. संघाच्या मुशीत तयार झालेले विजय साने यांनी 1980 साली भाजपत प्रवेश केला. गेली चार दशके ते या पक्षाशी एकनिष्ठ आहेत. प्रारंभी वॉर्ड अध्यक्ष नंतर युवा मोर्चाचे चिटणीस आणि त्यानंतर तर तीन वेळा नाशिक महानगर अध्यक्षपद भूषवण्याची संधी त्यांना लाभली. सामाजिक कार्य करतना त्यांनी जनसंपर्कही वाढवला.

1992 साली नाशिक मनपा निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्याकाळात मनपावर काँग्रेसची सत्ता होती. नगरसेवक संख्येने कमी असले तरी भाजपने सत्ताधारी पक्षाला अनेकदा जेरीस आणले होते. स्थायी समितीचे सभापती असताना नाशकात मोफत अंत्यसंस्कार योजनेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.

सलग 15 वर्षे नगरसेवक, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, भाजप गटनेतेपद त्यांनी भूषवले. नाशिक मर्चंट्स को ऑप. बँकेवरही आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांना या बँकेचे चौथ्यांदा अध्यक्ष होण्याचा बहुमान लाभला. बँकेचे अध्यक्षपद ते समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेची विक्रमी घोडदौड सुरू आहे. जनस्थान सेवा मंडळ आणि जनस्थान पतसंस्थेचे ते संस्थापक चेअरमन आहेत.

तळागाळातील लोकांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी त्यांनी अटल पुरस्कार योजना सुरु केली. भाजपचा वटवृक्ष नाशकात फोफावण्यात साने यांचे योगदान मोलाचे आहे.

2014 आणि 2019 मध्ये नाशकात भाजपाचे तीन आमदार निवडून आले त्यामागेही साने यांची प्रेरणा आहे. उत्तम वक्तृत्व असल्याने त्यांना आज राज्यभर मागणी होते. पक्षाची भूमिका ते तन्मयतेने मांडतात. म्हणूनच आज पक्षात उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून त्यांचा सन्मान केला जातो.

भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली आहे. चित्पावन ब्राह्मण संघाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी वयाने आज 61 वर्षे पूर्ण केली असली तरी झपाटून काम करण्याचा त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. साने यांंना निरोगी आयुष्य लाभो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *