भगवंताच्या नामस्मरणाने जीवनातील संकटे दूर करण्याचा प्रयत्न करा – भास्करगिरी

jalgaon-digital
2 Min Read

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड करोनाच्या महामारीमुळे दर्शनासाठी बंद असल्याने यावर्षी अधिकमास सप्ताह छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आला.

मोजक्याच भक्तगणांच्या उपस्थितीत झालेल्या अधिकमास सप्ताहाची सोमवारी दि.28 सप्टेंबर रोजी भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता करण्यात आली.

मनुष्य जीवनात येणारे बरे वाईट प्रसंग हे परमात्म्याच्या कृपेने व त्याच्याच इच्छेने येत असतात. त्यास डगमगून न जाता भगवंताच्या नामस्मरणाने जीवनात आलेल्या संकटाला दूर करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन यावेळी भास्करगिरी महाराज यांनी केले.

दर तीन वर्षांनी येणार्‍या पुरुषोत्तम म्हणजेच अधिक मासानिमित्ताने देवगड येथे अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी करोनाच्या महामारीचे मोठे संकट असल्याने देवगड दर्शन बंद आहे.

यावर्षी देवगडच्या विद्यार्थ्यांनीच येथे छोटेखानी स्वरूपात अधिकमास महिन्यात खंड नको म्हणून भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन केले. यामध्ये पंचवीस ते तीस भाविकांच्या उपस्थितीत किर्तनाचे कार्यक्रम भगवान दत्तात्रयांच्या मंदिरात पार पडले.

अधिकमास महिन्यात होणार्‍या अखंड हरिनाम सोहळयामध्ये गर्दी नको म्हणून याआधीच गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी देवगड येथे कोणीही दर्शनासाठी येऊ नये घरी बसूनच व्रतवैकल्ये पार पाडावीत ,असे आवाहन केले होते.

सोमवारी काल्याच्या कीर्तनात भास्करगिरी महाराज म्हणाले, हा महिना भगवंताचे नामस्मरण व चिंतन करण्याचा पवित्र महिना आहे. कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता धैर्याने त्याचा सामना करा भगवंताच्या नामचिंतनाने त्याला जोड द्या,जीवनात येणारे अडथळे दूर करत ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न करा, निर्माण होणार्‍या समस्यांना विचारानेच पार पाडण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.

काला कीर्तन कार्यक्रमप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नारायण महाराज ससे, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, बजरंग विधाते, सरपंच अजय साबळे, उपस्थित होते. बाळासाहेब पाटील यांच्यावतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *