Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूरचे आरक्षित प्लॉट गिळण्याचा घाट हाणून पाडू - भारती कांबळे

श्रीरामपूरचे आरक्षित प्लॉट गिळण्याचा घाट हाणून पाडू – भारती कांबळे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत शहरातील नगररचना अंतिम स्कीम 2 मधील खेळाच्या मैदान व शाळेच्या आरक्षित जागेचे आरक्षण उठविण्याचा घाट घातला जात आहे.

- Advertisement -

एकप्रकारे श्रीरामपूर विकण्याचा हा प्रयत्न असून सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन हा डाव हाणून पाडू, असा इशारा महाविकास आघाडीच्या गटनेत्या भारती कांबळे यांनी दिला आहे.

गुरुवार दि. 4 फेब्रुवारीला होणार्‍या नगरपरिषद सर्वसाधारण सभेत वादग्रस्त ठराव घेण्याचा विषय घेतला गेला आहे. यामध्ये खेळाचे मैदान व शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेचे आरक्षण काढण्याचा ठराव घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अंतिम मंजूर स्कीममध्ये फेरबदल करण्याचा ठराव घेण्याचा नगरपालिका सभागृहाला अधिकार आहे का? शहरात अनेक लोकांच्या जागा गेल्या 35 वर्षांपासून आरक्षणमध्ये अडकलेल्या असताना त्यांना बाजूला ठेवून फक्त विशिष्ट लोकांना लाभ मिळावा म्हणून नगरपालिकेच्या सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे.

जर अशा प्रकारच्या ठरावामुळे एखाद्या सत्ताधार्‍यांच्या मर्जितल्या प्लॉटधारकाला दुबार लाभ मिळाला, तर भविष्यात शासन ठराव मंजूर करणार्‍या सर्व नगरसेवकांकडून वसुली काढून त्यांच्या संपत्तीवर बोजे टाकू शकते. दि. 4 फेब्रुवारीला होत असलेल्या सर्वसाधारण सभेत यावर आपण आवाज उठविणार आहे.

नगरपालिकेतील सत्तेचे बलाबल बघता असा वादग्रस्त विषय मंजूर अथवा नामंजूर होण्याची शक्यता आता वर्तविणे कठीण असले तरी शहरात मोजकेच खेळाचे मैदान उरलेले असल्याने हे मैदान गिळंकृत होऊ नये, अशी धारणा सर्वसामान्य श्रीरामपूरकरांची झालेली आहे. याबाबत सर्व नगरसेवक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान कांबळे यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे हे प्रकरण निर्णायक वळणावर आले असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

पालिकेला अधिकार आहे का? – लुणिया

नगररचना अंतिम स्कीम 2 मधील खेळाच्या मैदान व शाळेच्या आरक्षित जागेचे आरक्षण उठविण्याचा जो ठराव पालिकेच्या सभेत मांडला जात आहे तो ठराव मांडण्याचा अधिकार पालिकेला आहे का? या जागांबरोबरच अन्य जागांचे आरक्षण उठविण्याचा ठराव करावा, अशी मागणी नगरसेवक किरण लुणिया यांनी केली आहे. जर एखाद्या जागेचा टीपी सॅक्शन फायनल असताना अशा प्रकारचा ठराव पालिका कशी काय करु शकते? जर हा न्याय या जागेसाठी दिला जात असेल तर शहरातील अन्य जागांचे आरक्षण उठविण्यासाठी तसा न्याय देण्यात यावा, असेही लुणिया यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या