Friday, April 26, 2024
Homeनाशिकसुनावणीपूर्वीच सीईओ दालनाबाहेर दिव्यांग तक्रारदारास दोघांची मारहाण

सुनावणीपूर्वीच सीईओ दालनाबाहेर दिव्यांग तक्रारदारास दोघांची मारहाण

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

टोकडे (ता.मालेगाव) ग्रामपंचायतमधील वादाबाबत जिल्हा परिषदेत सुनावणीपूर्वीच सीईओच्या दालनाबाहेर दिव्यांग तक्रारदारास दोघांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. ७) घडली. प्रशासनाने तत्काळ पोलिसांना बोलवत तक्रार दिली. पोलिसांना बघताच मारहाण करणारे संशयीत फरार झाले.

- Advertisement -

टोकडे ग्रामपंचायतीने केलेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार येथील रहिवासी विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. त्याआधारे चौकशी समिती नेमून झालेल्या प्रकाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. ७) सुनावणी होती.

त्यानुसार गावच्या सरपंच सुपडाबाई पंडित निमडे यांच्यावतीने अ‍ॅड. सचिन वाघ, ग्रामपंचायतीचे रोजगारसेवक हरेसिंग धाडीवाल, नामदेव शेजवळ आणि शांताराम लाठर हे जिल्हा परिषदेत उपस्थित होते. रावसाहेब थोरात सभागृहात सुनावणी सुररू होण्याच्या काहीवेळ अगोदर विठोबा द्यानद्यान हे येथे पोहोचले.

त्यांना बघताच नामदेव शेजवळ व शांताराम लाठर या दोघांनी त्यांच्या शर्टची कॉलर पकडून मारहाण केली. या दोघांनी विठोबाला पकडले अन् ‘अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात तू फरार आरोपी आहेस. चल तुला सीईआेंपुढे उभे करतो’, असे म्हणत सीईओंच्या दालनाकडे ओढले. हा काय प्रकार सुरू आहे, याची शहानिशा करण्यासाठी सीईओ बनसोड या आपल्या दालनाच्या बाहेर आल्या आणि त्यांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला.

परंतु , मारहाण करणारे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी विठोबाला सोडले नाही. अखेर पोलिसांना बोलवण्याची सूचना सीईओ बनसोड यांनी केली. त्यानंतर मारहाण करणारे घटनास्थळावरुन पळून गेले. या प्रकरणी भ्रद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दिव्यांग व्यक्तीस शासकीय कार्यालयात मारहाण केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे. प्रशासनाने याची योग्य दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा.

विठोबा द्यानद्यान, तक्रारदार

- Advertisment -

ताज्या बातम्या