Saturday, April 27, 2024
Homeनगरगस्तीसाठी तयार केलेल्या बीट मार्शल धूळखात

गस्तीसाठी तयार केलेल्या बीट मार्शल धूळखात

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

शहरात होणार्‍या चोर्‍या, घरफोड्या, सोनसाकळीच्या घटना रोखण्यासाठी शहर पोलिसांनी फेब्रुवारी 2020 मध्ये 10 दुचाक्यांवर 40 पोलीस कर्मचार्‍यांची गस्त सुरू केली होती.

- Advertisement -

गस्तीसाठी 10 बीट मार्शल (दुचाकी) निर्मिती करण्यात आली होती. मात्र, या बीट मार्शल सध्या पोलीस ठाण्यात धूळखात पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, करोना अनलॉकनंतर शहरात चोर्‍या, घरफोड्या, सोनसाकळीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शहर पोलिसांनी गस्तीमध्ये वाढ करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शहरातील तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या चोर्‍या, घरफोड्या रोखण्यासाठी तत्कालीन प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहरपोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी मोटार परिवहन विभागाकडून दहा दुचाकी तयार करून घेतल्या होत्या. तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता तेथे पाच दुचाकी, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत चार दुचाकी तर, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत एक अशा दहा दुचाकीवरून शहरात दररोज चोवीस तास गस्त घालण्याचे नियोजन पोलिसांनी केले होते.

यासाठी तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील 20 कर्मचारी व मुख्यालयातील 20 कर्मचारी अशा 40 कर्मचार्‍यांची नेमणूक केली होती. आता या बीट मार्शल पोलीस ठाण्यात धूळखात पडल्या आहेत. शहर पोलिसांनी या बीट मार्शलवरून नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे गस्त घातली. मात्र, त्यानंतर मोठ्याप्रमाणात खर्च करून तयार केलेल्या या बीट मार्शल पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात पडून आहेत.

पांढर्‍या रंगाच्या या दुचाकीला समोरून एक काच बसविण्यात आली आहे. या दुचाकीला बीट मार्शल असे नाव देण्यात आले आहे. तसेच, लाल व निळ्या रंगाचे दोन दिवे, सायरन बसविण्यात आला आहे. गस्तीवरील लोकेशनसाठी दुचाकीला जीपीएस बसविण्यात आले आहे. अशा सर्व सुविधा असलेल्या दुचाक्या एक वर्षाभरात बंद पडल्या आहेत. यामुळे सध्या पोलिसांना स्वत:च्या दुचाक्यांवर गस्त घालण्याची वेळ आली आहे.

दुसरीकडे शहरातील चोर्‍या, घरफोड्यांच्या घटना बंद झाला नसल्याचे चित्र आहे. करोनाच्या सुरूवातीच्या काळात चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या. अनलॉक प्रक्रियेनंतर यात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे.

बाजारातून मोबाईल चोरणे, घरासमोरून दुचाकी चोरणे, अपार्टमेंटमध्ये पाळत ठेऊन लोक फ्लॅट बंद करून बाहेर गेल्यावर ऐवज लंपास करणे, धूम स्टाईलने दागिणे ओरबडणे अशा घटना वारंवार होत आहे. या घटना करणारे काही ठराविक चोरटे आहेत. त्यांचा बंदोबस्त केला तर अशा घटनांना आळा बसण्यात मदत होईल. मात्र, पोलिसांवर वाढत्या कामाच्या व्यापामुळे गुन्हेगारीचे मुळे शोधण्यात वेळ मिळत नाही.

संबंधीत पोलीस ठाण्यातील बीट मार्शलची अवस्था पाहण्यात येईल. ग्रामपंचायत मतमोजणी बंदोबस्त संपल्यावर बीट मार्शलचा आढावा घेऊन त्या सुरू करून घेण्यात येईल. शहरातील गस्तीसाठी बीट मार्शल आवश्यक आहे.

– विशाल ढुमे (शहर पोलीस उपअधीक्षक)

तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील गस्तीसाठी सध्या दिवसा 6 व रात्री 6 अशा 12 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. सरकारी वाहनांचे काही खरे नसते. यामुळे कर्मचारी गस्तीसाठी स्वत: च्या दुचाक्यांचा वापर करत आहे. लवकरात लवकर दुचाक्यांची दुरूस्ती केली जाईल.

– सुनील गायकवाड (पोलीस निरीक्षक, तोफखाना).

- Advertisment -

ताज्या बातम्या