कर्डिले साहेब, 15 हजारांत तुम्हीच गाय घेऊन द्या

jalgaon-digital
2 Min Read

बक्तरपूर|वार्ताहर| Bakatarpur

प्रत्येकी 15 हजार रुपयाप्रमाणे 10 गायींसाठी दीड लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज शेतकर्‍यांना अल्प व्याजदरात देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जाहीर केले आहे. जर 15 हजारांत दुभती गाय भेटत असेल तर कर्डिले साहेबांनी 15 हजारांप्रमाणे गाया घेऊन द्याव्यात, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब फटांगरे यांनी केले आहे.

जिल्हा सहकारी बँकने चालू हंगामात पशुपालन, मत्स्य व्यवसाय, शेळी, मेढी पालन व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. प्रत्येकी 15 हजार रुपयांप्रमाणे 10 गायींसाठी दीड लाख रुपयांचे कर्ज शेतकर्‍यांना अल्प व्याजदरात देण्याचा निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे.

सेवा सहकारी संस्थेच्या सचिवांनी प्रत्येक गावातून या निर्णयाची कोटेकोरपणे अंमलबजावणी करत कमीतकमी 50 शेतकर्‍यांची प्रकरणे जिल्हा बँकेच्या शाखेकडे पाठविण्यात यावे, असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी तालुका विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने सेवा संस्थेच्या सचिवांच्या बैठकीत केले होते. यासंदर्भात शेवगाव तालुक्यात ग्रामीण भागामध्ये शेतकर्‍यांमध्ये प्रतिक्रिया उमटल्या. सध्या दुभत्या जनावरांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत.

माजी मंत्री कर्डिले यांनी यापूर्वी नगर शहरामध्ये दुग्ध व्यवसाय केला असल्याने दुग्ध जनावरांचा त्यांना चांगला अनुभव आहे. जर 15 हजारांमध्ये गायी खरेदी होत असतील तर कर्डिले साहेबांनी स्वतः गायी खरेदी करून द्याव्यात. प्रत्येक गावातून शंभरपेक्षा जास्त प्रकरणे जिल्हा बँकेकडे पाठवू, असे आवाहन शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब फटांगरे यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *