Friday, April 26, 2024
Homeनगरबेवारस बॅगमध्ये बॉम्बची अफवा; पुढे झाले असं काही

बेवारस बॅगमध्ये बॉम्बची अफवा; पुढे झाले असं काही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात मंगळवारी सकाळी एक बेवारस बॅग मिळून आली. यामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली होती. नगर तालुका पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने तपासणी केली असता त्या बॅगमध्ये हार्मोनियम आढळून आले. यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

- Advertisement -

कामरगाव शिवारातील हॉटेल रेणुका परिसरात मंगळवारी पहाटे शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथील व्यक्तीचे चारचाकी वाहन पंक्चर झाले होते. पंक्चर काढण्यादरम्यान वाहनातील सर्व साहित्य बाहेर काढले होते. पंक्चर काढून झाल्यानंतर साहित्य वाहनात भरून ते मार्गस्थ झाले. मात्र, अंधारात हार्मोनियमची बॅग त्याठिकाणीच विसरून राहिली होती. सकाळी नागरिकांना बॅग दिसली असता त्यात बॉम्ब असल्याची अफवा परिसरात पसरविण्यात आली होती. याबाबत नगर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली.

नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी तातडीने उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्यासह पथकाला घटनास्थळी पाहणी करण्याचे आदेश दिले. चव्हाण यांनी याबाबत बॉम्ब शोधक पथकाला कळविले असता बॉम्ब शोधक पथक देखील त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये हार्मोनियम आढळून आले. त्यानंतर परिसरात माहिती घेतली असता वाहन पंक्चर झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधत त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत हार्मोनियमची बॅग त्यांच्या ताब्यात दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या