अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

गुवाहाटी, आसाम येथे आयोजित कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय मैदानी (ऍथलेटिक्स) स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या नाशिकच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवत महाराष्ट्रासाठी पदकांची कमाई करून दिली. या सर्व खेळाडूंचा सत्कार नाशिककरांच्या वतीने करण्यात आला.

राष्ट्रीय स्पर्धेत 18 वर्षे मुलींच्या 3000 मीटर रनींगमध्ये नाशिकच्या रिंकी पावरानें 9 मिनिट 55. 04 सेकंदात ही धाव पूर्ण करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर पल्लवी जगदळेनेही 10 मिनिट 16. 08 सेकंदात आपली धाव पूर्ण करून कांस्यपदकाची कमाई केली. तर लांब पल्याच्या धावण्याच्या शर्यतीत हुकूमत असलेल्या नाशिकच्या स्वयंम बढेने 400 मीटर अडथळ्याच्या (400 मीटर हर्डल्स) शर्यतीत 53. 91 सेकंदामध्ये रेस पूर्ण करून रौप्य पदक आपल्या नावे करून नाशिकचे खेळाडू या प्रकारातही चांगली कामगिरी करू शकतात याची प्रचीती दिली.

याचबरोबर या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या नाशिकच्या धर्यशील पाटील, सतीश देशमुख, अद्वैत इनूरकर, दिलीप गावित आणि वैष्णवी कातोरे यांनीही पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.

या खेळाडूंना आसाम येथे जाण्यासाठी नाशिकच्या दानशूर व्यक्तीनी त्यांना विमानाने स्पर्धास्थळी पाठवण्यासाठी जबाबदारी स्वीकारून मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेही खेळाडूंना आपला सर्वोत्तम खेळ सादर करण्यास मोलाची मदत झाल्याचा भावना खेळाडूंनी व्यक्त केल्या.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनीही खेळाडूंना सरावासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. खेळाडूंना या सर्व सुविधा मिळाव्या यासाठी नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे चेअरमन हेमंत पांडे यांनी विशेष प्रयत्न केले.

आसाम येथे पार पडलेल्या स्पर्धेत पदकांची कमाई करणार्‍या खेळाडूंना आणि त्यांचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग, सिद्धार्थ वाघ, सुरेश काकड यांना प्रमुख अतिथी नाशिकची अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिंपियन खेळाडू कविता राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, राहुल देशमुख, गंगाधर जाधव, चंद्रशेखर सिंग, यतीन पटेल, हेमंत पांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा असोसिएशनचे चेयरमन हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगीरी खजिनदार मनोज पवार आणि असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.