Wednesday, April 24, 2024
Homeनगरआषाढी दिंड्यांसाठी आरोग्य विभागाचे दिवस आणि रात्री स्वतंत्र पथके

आषाढी दिंड्यांसाठी आरोग्य विभागाचे दिवस आणि रात्री स्वतंत्र पथके

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने यंदा आषाढी वारी आणि वारीतील वारकरी यांची आरोग्यविषयक विशेष काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्य पातळीवरून आरोग्य विभागाची स्वतंत्र बैठक घेत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय यांनी नियोजन सुरू केले असून नगर जिल्ह्यातून मार्गक्रमण होणार्‍या दिंड्या आणि वारकरी यांच्यासाठी दिवस आणि रात्री आरोग्य विभागाची स्वतंत्र पथके तैनात करण्यात येणार आहेत. यासह जिल्ह्यातील दिंड्याचे आरोग्य नियोजन करण्यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) दि. 9 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

येत्या 29 जूनला आषाढी एकादशी आहे. या दिवशी पंढरपूरला विठ्ठल-रखूमाई मंदिरात होणार्‍या महासोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी नगरसह राज्याच्या कानाकोपर्‍यातून वारीकरी हजेरी लावतात. राज्यातील विविध भागातून हजारो दिंड्या आणि वारकरी पंढरपूरला जातात. नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाण दिंडी आणि वारकरी नगर जिल्ह्यातून दरवर्षी जात असतात. दरवर्षी या दिंड्या आणि वारकरी यांच्या आरोग्यासह अन्य सुविधांसाठी प्रशासन सज्ज असते.

यंदा मात्र, आरोग्य विभागासह अन्य शासकीय विभागांनी जोरदार तयारी सुरू केली असून वारी यांच्यासह वारकरी यांना आरोग्यासह स्वच्छ पिण्याचे पाणी, तसेच अन्य सुविधा देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आरोग्य मंत्री सावंत यांनी राज्य पातळीवरून ऑनलाईन आरोग्य विभागाची बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी सिध्दीराम सालीमठ यांनी देखील प्रशासनाची मागील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेतलेली आहे.

त्यानुसार आरोग्य विभागाने जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने वारकरी आणि दिंड्यांसाठी दररोज दिवसा आणि रात्री दोन स्वतंत्र पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकासोबत रुग्णवाहिका आणि आवश्यक वैद्यकीय पथक यांचा समावेश राहणार आहे. यासह आवश्यक औषधांचा साठा ठेवण्यात येणार असून दिंड्या आणि वारकरी यांना आरोग्यविषयक सुविधा देण्यात येणार आहेत. हे पथक संबंधित दिंडी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर दिंडी आणि वारकरी जिल्ह्यातून मार्गक्रमण करत जिल्ह्याच्या हद्दीबाहेर पडेपर्यंत कार्यरत राहणार आहेत. यासाठी तारीखनिहाय नियोजन करण्यात आले असून दिंडी मार्गावरील जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य संस्था, वैद्यकीय मनुष्यबळ सज्ज राहणार आहे.

जिल्ह्यात येणार्‍या दिंड्यातील वारकरी यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत कोविडचा कार्यकाळ सोडून वारकरी यांच्या संख्येत 15 ते 20 टक्के वाढ अपेक्षीत आहे. त्यानुसार आरोग्य विभाग जिल्ह्यात ठिकठिकाणी नियोजन करणार आहे. दिंड्या आणि पावसाचे आगमन एकाच वेळी होत असल्याने साथीचे रोग नियंत्रणावर भर देण्यात येणार आहे. दिंडी मार्गावर आवश्यक तातपुरते आरोग्य तंबू, केंद्र उभारण्यात येणार आहेत.

दिंडी मार्गावरील हॉटेल या ठिकाणी असणारे पाणी आरोग्य विभागाकडून तपासण्यात येणार आहे. तसेच दिंडी मार्गावर मोठ्या प्रमणात मनुष्यबळ आवश्यक असणार आहे. यासाठी स्वयंसेवक, आरोग्यदूत यांची नियुक्ती करण्यात येणार असून वारकरी आणि दिंडी यांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या