Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक संपावर

जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक संपावर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दबाव तंत्राने बळजबरीने करून घेतले जाणारे ऑनलाईनचे काम बंद होण्यासाठी जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चाने येऊन बेमुदत संपाची हाक दिली. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने (महाराष्ट्र राज्य) मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील 3200 आशा सेविका व 190 गट प्रवर्तक संपावर गेले आहेत. जोपर्यंत ऑनलाईनचे काम काढून घेतले जात नाही, तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

- Advertisement -

बुरूडगाव येथील भाकपच्या कार्यालयापासून मोर्चाची सुरूवात झाली. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा जिल्हा परिषदेत धडकला. या आंदोलनात आयटकचे राष्ट्रीय सदस्य कॉ. अ‍ॅड. सुधीर टोकेकर, संघटनेच्या अध्यक्षा सुवर्णा थोरात, मार्गदर्शक कारभारी उगले, जिल्हा संघटक कॉ. सुरेश पानसरे, कॉ. निवृत्ती दातीर, कॉ. उषा अडांगले, आशा देशमुख, वर्षा चव्हाण, जयश्री गुरव, अश्विनी गोसावी, कॉ.निर्मला खोडदे, स्मिता ठोंबरे, स्वाती इंगळे, शारदा काळे, अंजली तरकसे, वर्षा माडूले, प्रमोदिनी धावणे, स्वाती भणगे, सविता धापटकर, हुसाळे, अशपा शेख, सुप्रिया जाधव, सुलभा भदगले, वैशाली गायकवाड, यमुना दळवी, अरुणा आगरकर, सोनिया तांबे, सुनीता साठे, मनीषा कुलट, कविता साळवे आदींसह आशा सेविका व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आशा वर्कर यांना आयुष्यमान भारत व गोल्डन कार्ड बाबतचे काम बळजबरीने करून घेतले जात आहे. या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. हा संप 16 ऑक्टोबर रोजी होणार होता, परंतु संघटनेतील कृती समितीच्या पदाधिकार्‍यांची मुंबई येथे बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा न निघाल्याने हा राज्यव्यापी संप 18 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आला असल्याचे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

आयुष्यमान भारत व गोल्डन कार्ड संबंधित इंग्रजीमध्ये ऑनलाईन माहिती भरणे अत्यंत किचकट व अवघड आहे. अनेक आशांकडे स्मार्ट फोन देखील नसल्याने या कामासाठी त्यांना अडचणी येत आहेत. या कामाचा योग्य मोबदला देखील त्यांना दिला जात नाही. आशा वर्कर यांना हे काम करण्यासाठी दडपण आणले जाते व बळजबरीने काम करून घेतले जात असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.

आशा वर्कर यांना ऑनलाईनची कामे देऊ नये, गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारीचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी भत्ते लागू करावे, जोपर्यंत शासकीय कर्मचार्‍याचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचारी (एनएचएम) प्रमाणे वेतनश्रेणी द्यावी, कंत्राटी कर्मचारी यांना लागू असलेली वार्षिक वेतनवाढ 5 टक्के व बोनस 15 टक्के गटप्रवर्तक यांना देऊन त्यांना सुट्ट्या लागू कराव्या, प्रवास भत्ता वेगळा द्यावा, गटप्रवर्तकांचे नाव बदलून आशा सुपरवायझर करावे, गटप्रवर्तकांना विना मोबाईल ऑनलाईन कामे सांगण्यात येऊ नये, आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट द्यावी, आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ मिळवून द्यावी, आशांना किमान वेतन लागू करावे, अशा वर्कर यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्यावर दबाव आणि बळजबरीने कामे करून घेण्याचा प्रकार थांबवावा, आशांना दरमहा वेतन द्यावे व प्रत्येक महिन्याला त्याची पगार स्लिप देण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. मोर्चाचे निवेदन राष्ट्रीय ग्रामीणचे नियंत्रक अमोल शिंदे व जिल्हा समन्वयक संज्योत उपाध्ये यांना देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या